आगीत तुरीच्या गंजीचा कोळसा
By Admin | Updated: February 26, 2017 00:51 IST2017-02-26T00:51:24+5:302017-02-26T00:51:24+5:30
येथील शेतकऱ्याने तुरीची कापणी करून त्या वाळविण्याकरिता एक गंजी करून शेतात ठेवली होती.

आगीत तुरीच्या गंजीचा कोळसा
चार लाखांचे नुकसान : आगीचे कारण गुलदस्त्यात
विजयगोपाल : येथील शेतकऱ्याने तुरीची कापणी करून त्या वाळविण्याकरिता एक गंजी करून शेतात ठेवली होती. या गंजीला शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत वाळण्याकरिता ठेवलेल्या तुरीचा कोळसा झाला. या आगीचे कारण मात्र कळू शकले नाही. यात शेतकऱ्याचे ४ लाख रुपयांचे नुकसान झाले.
येथील शेतकरी प्रशांत मधुकर नानोटी यांची विजयगोपाल येथे शेती आहे. त्यांच्या शेतीचे दोन भाग असून यात एक पाच एकर आणि दुसरा १० एकर असे दोन पट्टे आहे. याव्यतिरिक्त काही जमीन ते दरवर्षी मक्त्याने करतात. या जमिनीत त्यांनी यंदा कपाशी व तूर असे पीक घेतले होते. त्यांनी शेतातील संपूर्ण तूर कापल्यानंतर गावाजवळील एका शेतात दोन्ही शेतातील कापलेल्या तुरीची गंजी मारून ठेवली. या गंजीत सुमारे ९०० पेट्या असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
या ९०० पेट्यांतून त्यांना ६० ते ७० क्विंटल तुरीचे उत्पादन होईल अशी अपेक्षा होती. पण आज दुपारी त्यांच्या शेतात असलेल्या तुरीच्या गंजीला आग लागली. याची माहिती मिळण्यापूर्वी गंजीतील तुरीचे पीक जळून खाक झाले. यात नानोटी यांना सुमारे ४ लाखांचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वर्षभर कष्टकरुन हाती आलेले पीक क्षणात नष्ट झाल्याने आधिच संकटात असलेला शेतकरी अडचणित सापडला आहे. या नुकसानीची शासनाकडून मदतीची मागणी होत आहे. तलाठी तामगाडगे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अहवाल देवळी तहसीलदारांकडे पाठविला आहे.(वार्ताहर)