शैक्षणिक प्रतिकृतींमधून घडतोय बालकांचा ज्ञानसंवाद
By Admin | Updated: April 3, 2017 01:28 IST2017-04-03T01:28:23+5:302017-04-03T01:28:23+5:30
बालकांच्या सुप्त कलागुणांना संधी मिळावी. आधुनिक शिक्षणाची जीवनमूल्ये त्यांच्यात रूजावी, यासाठी बालक व पालकांच्या

शैक्षणिक प्रतिकृतींमधून घडतोय बालकांचा ज्ञानसंवाद
पालकांचाही सहभाग : ज्ञानरचनावादी शिक्षण प्रणाली राबविण्याकडे कल
वर्धा : बालकांच्या सुप्त कलागुणांना संधी मिळावी. आधुनिक शिक्षणाची जीवनमूल्ये त्यांच्यात रूजावी, यासाठी बालक व पालकांच्या सहकार्याने ‘टुगेदर वुई क्रिएट’हा प्रेरणादायी शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला.
मागील दशकांत जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात वेगाने बदल झाले. इंग्रजी कॉन्व्हेंट संस्कृतीच्या आगमनाने शालेयपूर्व शिक्षणाचा गाभा पूर्णत: बदलल्याचे दिसून येत आहे. प्रचंड स्पर्धा व पालकांच्या पाल्यांविषयीच्या वाढत्या अपेक्षांमुळे तालुकास्तरावरही कॉन्व्हेंटची गर्दी वाढू लागली. मात्र, बालमानस व शिक्षण या दोन घटकांचा संबंध लक्षात न घेता केवळ व्यावसायिक हेतू पुढे ठेवून कॉन्व्हेंट सुरू केल्याचे दिसतात. त्यामुळे बालकांना वेगळे काहीतरी देण्याच्या प्रयत्नातून स्कूल आॅफ स्कॉलर्सने प्रेरणादायी शैक्षणिक परंपरा निर्माण करणारा उपक्रम राबविला. ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धतीचा अवलंब करुन हे उपक्रम राबविण्यात आले. यात विद्यार्थ्यांनी व पालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. शैक्षणिक अभ्यासक्रमासह मुलांचेर व्यक्तिमत्त्व घडविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
उपक्रमशील शिक्षकांच्या माध्यमातून बालकांची मने सुसंस्कारीत करण्याचे उपक्रम राबविण्यात आले. बालक पालकांच्या ज्ञानात्मक कलाकृतींचा आविष्कार त्याचेच फलीत आहे. या उपक्रमाबाबत प्राचार्य आरती चौबे म्हणाल्या, केवळ वर्गात बसून शिक्षण देणे याला मर्यादा आहेत. बालकांना आजूबाजूच्या सामाजिक व कौटुंबिक पर्यावरणातूनही बऱ्याच गोष्टी शिकता येतात. त्यासाठी आम्ही अभ्यासक्रमात तसे बदल करण्याची गरज आहे. बालकांच्या भावविश्वाला बळ देणाऱ्या उपक्रमांमुळे आत्मविश्वास वाढतो. बालके स्वत:हून विविध प्रकारचे ज्ञान आत्मसात करू लागतात. यावर त्यांनी भाष्य केले.
पर्यवेक्षिका मोनाली ठाकरे यांनी सांगितले की, बालक वर्गात आल्यानंतर शिक्षिकेच्या सानिध्यात राहतात. मात्र, सर्वाधिक वेळ पालकांच्या सहवासातच जातो. त्यामुळे अध्ययन व अध्यापनाच्या प्रक्रियेत पालकांना सहभाग वाढावा. शैक्षणिक उद्दीष्ट साध्य करण्यासाठी आम्ही पालकांना सामावून घेण्याचा उपक्रम राबविला. त्याचे प्रेरणादायी परिणाम बालकांवर दिसून आले. बालकांनी आई-वडिलांच्या सहकार्याने ज्ञानाला चालना देणारे अनेक मॉडेल्स तयार केले. मुख्य म्हणजे प्रत्येक मॉडेल बालकांचा ज्ञानात्मक पाया समृद्ध करण्यासाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक उद्दीष्टांचा भाग होता.
या उपक्रमाद्वारे कल्पनाशक्ती, गणित, विज्ञान, बुद्धीमत्ता, संभाषण, कौशल्य, सामान्य ज्ञान, विषय समजावून सांगण्याची हातोटी यासारख्या अनेक गुणांना चालना मिळत आहे. या उपक्रमासाठी शीतल सरोदे, अश्विनी वानखेडे, सुलक्षणा ठाकरे, अल्का वोरा, आरती गवळी, ममता काकडे आदी शिक्षिकांनी मोलाची भूमिका बजावली. यावेळी उपस्थित पालकांनी प्रश्न उपस्थित केले. या संवादाच्या माध्यमातून पालकांच्या अडचणी जाणुन घेत यावर मात करण्यासाठी काय उपाययोजना करता येईल, यावर चर्चा करण्यात आली. (स्थानिक प्रतिनिधी)