लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ‘ओमायक्रॉन’च्या पार्श्वभूमीवर शासनाच्या मार्गदर्शक सूचनांना केंद्रस्थानी ठेवून जिल्ह्यात सोमवार, ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील लाभार्थ्यांना कोविडची प्रतिबंधात्मक लस दिली जाणार आहे. त्यासाठीची संपूर्ण तयारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने पूर्ण केली असून, जिल्ह्यात नऊ केंद्रांवरून ही लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. एका केंद्रावरून प्रत्येक दिवशी ३०० असे नऊ केंद्रांवरून एकूण २ हजार ७०० लाभार्थ्यांना कोविडची प्रतिबंधात्मक लस देण्याचे सध्या निश्चित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या ‘ओमायक्रॉन’ या व्हेरिएंटमुळेच जिल्ह्यावर कोविडच्या तिसऱ्या लाटेचे संकट असून, कोविडची लस ही कोरोना मृत्यू राेखण्यासाठी उपयुक्त असल्याने नागरिकांनीही त्यांच्या घरातील १५ ते १८ वयोगटातील बालकांना नजीकच्या केंद्रावर जाऊन कोविडची प्रतिबंधात्मक लस द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
६३ हजार ९९० लाभार्थ्यांना मिळेल कोव्हॅक्सिन
- २०२१ च्या जनगणनेनुसार १३ लाख १३ हजार ३३५ लोकसंख्या असलेल्या वर्धा जिल्ह्यात १५ ते १८ वयोगटातील ६३ हजार ९९० बालकांना प्राधान्य क्रमाने कोविडची लस देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. ‘ओमायक्रॉन’च्या पार्श्वभूमीवर ३ जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होणार असून, या लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन ही कोविड प्रतिबंधात्मक लस दिली जाणार आहे.
जिल्ह्यातील या केंद्रांवर मिळणार कोविडची लस- पोलीस रुग्णालय वर्धा- टाका ग्राउंड नागरी प्रा.आ. केंद्र, हिंगणघाट- ग्रामीण रुग्णालय वडनेर- ग्रामीण रुग्णालय समुद्रपूर- ग्रामीण रुग्णालय सेलू- उपजिल्हा रुग्णालय आर्वी- ग्रामीण रुग्णालय पुलगाव- ग्रामीण रुग्णालय आष्टी- ग्रामीण रुग्णालय कारंजा
ऑनलाईन अन् ऑफलाईन सुविधा- १५ ते १८ वयोगटातील लाभार्थ्यांना सोमवारपासून नऊ केंद्रांवरून प्रत्यक्ष लसीकरण होणार आहे. या प्रत्येक केंद्रावरून प्रत्येक दिवशी ३०० लाभार्थ्यांना लस दिली जाणार असून, यात ऑनलाइन पद्धतीने नोंदणी व अपॉइंटमेंट घेऊन येणाऱ्या २००, तर स्पॉट नोंदणी आणि अपॉइंटमेंट घेणाऱ्या १०० लाभार्थ्यांचा समावेश राहणार आहे.