बालोद्यान व गांधी चौक चिखलातच; पालिका उदासीन

By Admin | Updated: August 1, 2014 00:25 IST2014-08-01T00:25:39+5:302014-08-01T00:25:39+5:30

शहराच्या आठही दिशांकडून येणारे आठ रस्ते जोडणारा, देशातील मोठ-मोठ्या नेत्यांच्या सभा, विविध कार्यक्रम गाजविणारा एकेकाळचा गांधी चौक आज विविध समस्यांनी ग्रासला आहे.

Children and Gandhi Chowk are in the clay; Municipal | बालोद्यान व गांधी चौक चिखलातच; पालिका उदासीन

बालोद्यान व गांधी चौक चिखलातच; पालिका उदासीन

पुलगाव : शहराच्या आठही दिशांकडून येणारे आठ रस्ते जोडणारा, देशातील मोठ-मोठ्या नेत्यांच्या सभा, विविध कार्यक्रम गाजविणारा एकेकाळचा गांधी चौक आज विविध समस्यांनी ग्रासला आहे. दशकापूर्वी सौंदर्यीकरणाच्या नावावर करण्यात आलेल्या विद्रुपिकरणाने हा चौक पहिल्याच पावसात चिखलात असतो़ यामुळे शहरवासियांना भाजीबाजारात जातानाही चिखल तुडवितच जावे लागते़ यामुळे महात्मा गांधींच्या नावावर असणारे बालोद्यान व गांधी चौक चिखलातच राहणार काय, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत़
या चौकाकडे येणारे आठही रस्ते सिमेंट काँक्रीटचे बांधण्यात आले असून चौकापेक्षा उंच झाले आहेत. खोलगट भागात पाणी साचत असल्याने संपूर्ण चौकच जलमय होता़ चौकातील पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग नसल्यामुळे संपूर्ण चौकात पावसाचे पाणी साचून राहते. त्यातच भाजी बाजारातील सडका भाजीपाला रस्त्यातच पडलेला असतो़ यामुळे तो पाण्यात, सडून परिसरात दुर्गंधी पसरते़ यामुळे नागरिकांच्या सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शहरात व गांधी चौक परिसरात रस्ते व नाल्याची बांधकामे सुरू आहेत; पण दहा वर्षापूर्वी बांधण्यात आलेले या चौकातील डांबरी रस्ते दुरूस्त करून ही समस्या सोडवावी, असे कोणत्याच लोकप्रतिनिधीला वाटत नसल्याचे दिसते़ सत्ताधारी पक्षाचे तर सोडाच; पण विरोधी पक्षालाही ही समस्या दिसत नाही काय, असाही सवाल सामान्य नागरिक उपस्थित करीत आहे़ सत्तारुढ व विरोधी पक्षाचे अनेक मोठे कार्यकर्ते या परिसरात राहतात. त्यांच्या खांद्यावर शहर विकासाची धुरा आहे. त्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे होते; पण त्यांचेही दुर्लक्ष होत असल्याचेच दिसून येत आहे़ नगर पालिका प्रशासनाने महात्मा गांधी चौकातील गोलाकार रस्त्याचे सिमेंटीकरण करून ही समस्या निकाली काढावी, अशी मागणी होत आहे़(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Children and Gandhi Chowk are in the clay; Municipal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.