जिल्ह्यात राबविणार बाल स्वच्छता मिशन
By Admin | Updated: November 12, 2014 22:49 IST2014-11-12T22:49:15+5:302014-11-12T22:49:15+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ आॅक्टोबर २०१४ पासून राष्ट्रीय स्तरावर स्वच्छ भारत मिशनची सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने सार्वजनिक स्थळाच्या ठिकाणी स्वच्छता, घर व परिसरातील स्वच्छता

जिल्ह्यात राबविणार बाल स्वच्छता मिशन
वर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ आॅक्टोबर २०१४ पासून राष्ट्रीय स्तरावर स्वच्छ भारत मिशनची सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने सार्वजनिक स्थळाच्या ठिकाणी स्वच्छता, घर व परिसरातील स्वच्छता वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयाची बांधणी, अंगणवाडी व सार्वजनिक शौचालयाची बांधणी, उघड्यावर शौचालयाची प्रथा बंद करण्याकिरता कार्य सुरू आहे. या अंतर्गत जिल्ह्यात बाल स्वच्छता मिशन सुरू करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती मिलिंद भेंडे यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली आहे.
केंद्र शासनाच्या सुचनेंतर्गत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बाल स्वच्छता मिशन राबविण्यात येत आहे. यामध्ये स्वच्छतेचे संदेश, हात धुणे व प्रचार प्रसिद्धीकरिता बालकांना महत्त्वाचे दूत म्हणून या मोहिमेत सहभागी करून घ्यावयाचे आहे. आणि हा कार्यक्रम गाव, तालुका व जिल्हा स्तरावर राबवावयाचा आहे.
१४ ते १९ नोव्हेंबर २०१४ (जागतिक स्वच्छतागृह दिन) पर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये बालकांना लघुशंका व शौचालयाला जाण्याकरिता जागेची उपलब्धता, शाळामध्ये तसेच प्रत्येक घरी शौचालय व्यवस्था, बसस्थानक, बसथांबे, यात्रा स्थळे, उपहार गृहे, प्रक्षेणिय स्थळ, आठवडी बाजार, मैदाने, सार्वजनिक ठिकाणे स्वच्छतागृह उपलब्ध करून देणे व वेळेवर स्वच्छतागृह उपलब्ध होणे या बालकांच्या हक्कांची त्यांना जाणिव करून देण्यात येणार आहे.
स्वच्छतेच्या परिपाठामध्ये बालकांमध्ये स्वच्छतेची जागृती करणे हा या मागचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे.
बाल स्वच्छता मिशन अंतर्गत तालुका स्तरावर गाव व ग्रामपंचायत स्तरावर निबंध स्पर्धा, भित्तीचित्रक स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, स्वच्छ परिसर स्पर्धा, स्वच्छ शाळा व अंगणवाडी स्पर्धा, यास स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रविंद्र काटोलकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण यांच्यासह आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)