मुख्यमंत्री घेणार विकासाचा आढावा
By Admin | Updated: May 2, 2015 00:05 IST2015-05-02T00:05:21+5:302015-05-02T00:05:21+5:30
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी जिल्ह्यात येत असून ते जिल्ह्याच्या विकासाचा आढावा घेणार आहेत.

मुख्यमंत्री घेणार विकासाचा आढावा
प्रशासन सज्ज : कागदांची जुळवाजुळव सुरूच
वर्धा : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी जिल्ह्यात येत असून ते जिल्ह्याच्या विकासाचा आढावा घेणार आहेत. याची माहिती जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पूर्वीच मिळाली असल्याने त्यांच्याकडून कागदांची जुळवाजुळव करण्याकरिता गत आठ दिवसांपासून सुरू असलेली धावपळ शुक्रवारीही दिसून आली.
मुख्यमंत्री फडणवीस दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेणार आहे. या बैठकीत शेतकरी आत्महत्या व उपाययोजना हा महत्त्वाचा विषय आहे. सोबतच जलयुक्त शिवार अभियानाचाही आढावा मुख्यमंत्री घेणार आहे़ केम प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधायची होती. या प्रकल्पाचे जिल्ह्यात किती काम झाले, आतापर्यंत किती शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती झाली, याचाही आढावा घेणार आहेत. सोबतच सिंचन सुविधा, सेवागाम विकास आराखडा, धडक सिंचन विहीर कार्यक्रम, अतिवृष्टीतील नुकसान व भरपाईवर या बैठकीत विचारणा होणार असल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)