मुख्याधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने अपंगांना मिळाला न्याय
By Admin | Updated: March 30, 2017 00:41 IST2017-03-30T00:41:45+5:302017-03-30T00:41:45+5:30
नगर पंचायतने तीन टक्के निधी अपंगांच्या खात्यात जमा करावा या व अन्य मागण्यांसाठी

मुख्याधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने अपंगांना मिळाला न्याय
न.पं. समोर डेरा आंदोलन : ३ टक्के निधीचे होणार वाटप
सेलू : नगर पंचायतने तीन टक्के निधी अपंगांच्या खात्यात जमा करावा या व अन्य मागण्यांसाठी बुधवारी नगर पंचायतसमोर डेरा आंदोलन करण्यात आले. प्रहार अपंग क्रांती संघटननेने सकाळी १० वाजतपासून डेरा आंदोलन सुरू केले. दरम्यान, मुख्याधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्याने दुपारी आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी ३ टक्के निधीचे त्वरित वाटप केले जाणार असल्याची ग्वीही देण्यात आली.
अनेक दिवसांपासून येथील अपंग संघटनेकडून ३ टक्के निधी थेट त्यांच्या खात्यात रोख स्वरुपात जमा करावी, व्यापारी संकुलात ३ टक्के गाळे राखीव ठेवावे, अपंग लाभार्थ्यांना घरटॅक्समध्ये सवलत देण्यात यावी, आदी मागण्या लावून धरण्यात येत होत्या. त्यांच्या पुर्ततेकडे प्रशासनाने लक्ष द्यावे म्हणून संघटनेचे जिल्हा प्रमुख हनुमंत झोटींग, प्रदेश उपाध्यक्ष शैलेश सहारे, प्रमोद कुऱ्हाटकर, सुनील मिश्रा यांच्या नेतृत्वात डेरा आंदोलन करण्यात आले.
मागील अनेक महिन्यांपासून ३ टक्के निधी वाटपास नगर पंचायत टाळाटाळ करीत आहे. यामुळे जोपर्यंत हा निधी देण्यात येणार नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली. यामुळे प्रशासनाला नमते घ्यावे लागले. अपंगांच्या हक्काचा ३ टक्के निधीचा ९० हजारांचा धनादेश मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी नगराध्यक्ष डॉ. राजेश जयस्वाल यांना सोपविला. याप्रसंगी न.पं. उपाध्यक्ष चुडामन हांडे उपस्थित होते. सदर धनादेश बँकेत जमा होणार असून ती रक्कम ९७ लाभार्थ्यांना समान वाटप करण्यात येणार आहे. व्यापारी संकुलात ३ टक्के गाळे राखीव ठेवण्याबाबत तथा अपंग लाभार्थ्यांना घर टॅक्समध्ये सवलत देण्याबाबत नगर पंचायतच्या पुढील बैठकीमध्ये विचार करण्यात येणार असल्याची ग्वाही मुख्याधिकारी जाधव यांनी दिली. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांवर तोडगा निघाल्याने अपंगांनी समाधान व्यक्त करीत आंदोलन मागे घेतले. यात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह अपंगांनी सहभाग घेतला.(तालुका प्रतिनिधी)