छत्रपती संभाजी राजे प्रतिभावंत लेखक
By Admin | Updated: May 18, 2016 02:20 IST2016-05-18T02:20:48+5:302016-05-18T02:20:48+5:30
छत्रपती संभाजीराजांचे हिंदी, मराठी आणि संस्कृतवर प्रभुत्व होते. बालपणी आईसाहेब जिजाऊंनीच संभाजीराजांना संस्कृतचे शिक्षण दिले होते.

छत्रपती संभाजी राजे प्रतिभावंत लेखक
सुधीर पांगूळ : शंभूराजे जयंती कार्यक्रम
वर्धा : छत्रपती संभाजीराजांचे हिंदी, मराठी आणि संस्कृतवर प्रभुत्व होते. बालपणी आईसाहेब जिजाऊंनीच संभाजीराजांना संस्कृतचे शिक्षण दिले होते. म्हणूनच संभाजीराजांनी वयाच्या १४व्या वर्षी संस्कृतमध्ये बुधभूषण ग्रंथ लिहिला, असे मत शंभूराजे सोशल आॅर्गनायझेशन, युवा सोशल फोरमचे अध्यक्ष सुधीर पांगूळ यांनी व्यक्त केले.
शंभूराजे सोशल आॅर्गनायझेशन, युवा सोशल फोरमच्यावतीने सिव्हील लाईन स्थित शहीद स्मारक येथे छत्रपती संभाजीराजांची जयंती शनिवारी साजरी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी मराठा सेवा संघाचे सचिव सुधीर गिऱ्हे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मंगेश विधळे, कार्याध्यक्ष तुषार उमाळे, पराग भोयर, मिलिंद मोहोड, प्रवीण जगताप आदी उपस्थित होते.
पांगूळ पूढे म्हणाले की, कावेबाज, धूर्त, कपटी, स्वराज्यद्रोही, रक्तपिपासू, धर्ममार्तंड, मनुवादी गुप्त शत्रूंना पराभूत करण्यासाठी संभाजी राजांनी हातात लेखणी घेतली आणि ग्रंथलेखन केले. त्यामुळेच ते बहुजनांच्या साहित्यिक स्वातंत्र्यचेही जनक आहेत. त्यांनी नृपशंभू, शंभूराज, संभुकवी, संभराज, संभा, संभूज आदी नावांनी साहित्यिक रचना केल्याचे सांगितले. गिऱ्हे यांनी संभाजीराजे स्वत: विद्वान, अभ्यासू, जिज्ञासू, पराक्रमी, चरित्र्य संपन्न, प्रजावत्सल, न्यायी आणि स्वाभिमानी होते. हजारो वर्षांपासून सुरू असलेला, सांस्कृतिक दहशतवाद संपविण्यासाठी राजांनी बंड केले. भूमिपुत्रांना साहित्यिक, न्यायिक, सांस्कृतिक, प्रशासकीय स्वातंत्र्य देण्यासाठी वैदिकांविरूद्ध संघर्ष केला. यामुळे तेच खरे स्वातंत्र्यवादी आहे. स्त्री-स्वातंत्र्यचेही ते पुरस्कर्ते होते, असे सांगितले. विधळे, उमाळे यांनीही विचार व्यक्त केले.
प्रारंभी मशाल प्रज्वलित करून छत्रपतींना अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रशांत रोकडे, मयूर डफळे, निखिल झुंजूरकर, विवेक तळवेकर, विवेक डेहणकर, सतीश लांबट, प्रसन्ना इंगोले, श्याम बोटकुले, बशीर शेख, वैभव तळवेकर, अतुल शेंद्रे, रूपेश वाघमारे, समीर खान आदी पदाधिकारी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)