‘एटीएम व्हेरीफिकेशन’च्या नावे फसवणूक
By Admin | Updated: April 7, 2016 02:13 IST2016-04-07T02:13:00+5:302016-04-07T02:13:00+5:30
अनोळखी क्रमांकावरून आलेल्या फोनकॉल्सच्या माध्यमातून ‘एटीएम व्हेरीफिकेशन’ कॉल सांगून फसवणूक केल्याच्या घटना जिल्ह्यातच नाही तर राज्यात घडत आहेत.

‘एटीएम व्हेरीफिकेशन’च्या नावे फसवणूक
बँक ग्राहकांना गंडा : पोलीस अधीक्षकांनी केले सावध राहण्याचे आवाहन
वर्धा : अनोळखी क्रमांकावरून आलेल्या फोनकॉल्सच्या माध्यमातून ‘एटीएम व्हेरीफिकेशन’ कॉल सांगून फसवणूक केल्याच्या घटना जिल्ह्यातच नाही तर राज्यात घडत आहेत. याबाबतच्या तक्रारींमध्ये वाढ होत आहे. ग्राहकांना लाखो रुपयांनी गंडविल्याचेही समोर आले आहे. या संदर्भात नागरिकांत जागरुकता यावी म्हणून थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांनीच यापासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
गत काही महिन्यांपासून ‘एटीएम व्हेरीफिकेशन’च्या नावावर बँक ग्राहकांची फसवणूक करण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. नागरिकांच्या भ्रमणध्वनीवर अनोळखी क्रमांकावरून कॉल येतात. बँकच्या मुंबई वा दिल्ली आॅफिसमधून बोलत असल्याचे सांगण्यात येते. एटीएम कार्डचे व्हेरीफिकेशन सुरू आहे. यासाठी कार्डवरील १६ अंकी क्रमांक तसेच पिन नंबर विचारला जातो. याला बळी पडून ग्राहक ती माहिती देतो. त्यानंतर काहीच वेळात खात्यातून पैसे कमी झाल्याचा संदेश फोनवर ग्राहकाला येऊन आपली फसगत झाल्याचे लक्षात येते. याबाबत दाखल झालेल्या तक्रारींवरून ही बाब उघड होत आहे.
नियमानुसार बँक अशी कोणतीही माहिती मोबाईल फोनद्वारे विचारत नाही. यामुळे एटीएम कार्डवरील १६ अंकी क्रमांक आणि पिन नंबर कुणालाही सांगणे गरजेचे नाही. सदर दोन्ही क्रमांक केवळ बँक खातेदारालाच माहिती असणे गरजेचे आहे. एटीएम कार्डचा १६ अंकी क्रमांक व पिन नंबर न सांगितल्यास कार्ड बंद करण्याची धमकी दिली जाते; पण तसे काहीही होत नाही. यामुळे नागरिकांनी कुठलीही भीती न बाळगता थेट संबंधित पोलीस ठाण्यात संपर्क साधणे गरजेचे आहे. शिवाय पोलीस नियंत्रण कक्षामध्ये १०० क्रमांकावरही सूचना देता येते. एटीएममधून पैसे काढत असतानाही कुणाला आपला पिन नंबर दिसू देऊ नये, असे आवाहनही वारंवार केले जात आहे.
एटीएमबाबत जनजागृतीसाठी पोलीस अधीक्षकांनी संबंधित पत्रक प्रकाशित केले आहे. या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करून फसवणुकीच्या प्रकारावर आळा घालण्याचा प्रयत्न वर्धा पोलिसांकडून केला जात आहे. नागरिकांनीही एटीएम संबंधात कुणालाही माहिती न देता तत्सम कॉलबाबत पोलिसांना सूचना द्यावी असे आवाहनही ग्राहकांना केले जात आहे.(कार्यालय प्रतिनिधी)