ईपीएस १९९५ च्या पेन्शनधारकांची फसवणूक
By Admin | Updated: August 3, 2016 00:59 IST2016-08-03T00:59:49+5:302016-08-03T00:59:49+5:30
ईपीएस १९९५ च्या पेन्शन धारकांना अत्यल्प पेन्शन मिळत आहे. महागाईत या निवृत्त कामगारांना उदरनिर्वाह करणे कठीण झाले.

ईपीएस १९९५ च्या पेन्शनधारकांची फसवणूक
प्रकाश येंडे : सभेमध्ये कामगारांना न्याय देण्याची मागणी
पुलगाव : ईपीएस १९९५ च्या पेन्शन धारकांना अत्यल्प पेन्शन मिळत आहे. महागाईत या निवृत्त कामगारांना उदरनिर्वाह करणे कठीण झाले. सेवेत असताना वेतनातून कापण्यात आलेली रक्कम कामगारांना निवृत्तीनंतरही पूर्णपणे मिळत नाही. श्रमिकांच्या पेन्शन फंडाची बेकायदेशीर गुंतवणूक करून त्यांच्या पैशाची धुळधान करून शासनाने कर्मचारी निवृत्ती वेतन योजना १९९५ च्या पेन्शन धारकांची फसवणूक केली, असा आरोप ईपीएस ९५ सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश येंडे यांनी केला.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या कामगार भवनात आयोजित सभेत ते बोलत होते. ते पूढे म्हणाले की, जीवनाच्या शेवटच्या उंबरठ्यावरील सेवानिवृत्त वेतन धारकांच्या पेन्शन फंडात केंद्र शासनाने आपला वाटा २००६ ते २०११ पर्यंतचे दोन हजार कोटी रुपये भरले नाही. यानंतर विलंबाने भरले. अद्याप ३,२०० कोटी रुपये न भरता कामगारांची दिशाभूल केली, असा आरोप त्यांनी केला. ईपीएस ९५ च्या पेन्शनधारकांना अत्यल्प पेन्शन मिळत असून अन्याय केला जातो. अन्याय दूर करण्यासाठी कायद्यात दुरूस्ती करा. पेन्शनधारकांना ७ हजार ५०० रुपये पेन्शन व महागाई भत्ता द्या. कायद्यात दुरूस्ती होईपर्यंत अंतरिम राहत म्हणून कोशीयारी कमेटीच्या शिफारशी लागू करा या मागण्यांसाठी २१ आॅगस्ट रोजी नितीन गडकरी यांच्या नागपूर कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे सांगितले.
सभेला रमेश सावरकर, धनराज पटले यांनी मार्गदर्शन केले. संचालन करीत आभार मांगीलाल व्यास यांनी मानले. याप्रसंगी गुणवंत ठाकरे, रामचंद्र पुरोहित, चंदन साहू, भीमराव डोंगरे, बाबा चरडे, सुरेश मानकर, प्रल्हाद भालेराव, चंद्रकांत झाडे, मुलचंद चंदन, साहू यासह कामगार उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)