गरजा बदलवून नवी संस्कृती निर्माण करावी
By Admin | Updated: February 18, 2017 01:32 IST2017-02-18T01:32:37+5:302017-02-18T01:32:37+5:30
नोटबंदीचा परिणाम हा विषय चलचित्रपटासारखा आणि अतिशय गुंतागुंतीचा आहे.

गरजा बदलवून नवी संस्कृती निर्माण करावी
श्रीनिवास खांदेवाले : ‘नोटाबंदीचे परिणाम’ या विषयावर राज्यस्तरीय चर्चासत्र
वर्धा : नोटबंदीचा परिणाम हा विषय चलचित्रपटासारखा आणि अतिशय गुंतागुंतीचा आहे. आज नोटबंदी होऊन तीन महिने झाले. पंतप्रधानांनी तर ५० दिवसाची मुदत मागितली होती. परंतु आजही परिस्थिती पूर्ववत झालेली नाही. संशोधकांनी यावर चिंतन केले पाहिजे, असे आवाहन अर्थतज्ज्ञ व विदर्भवादी नेते डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी केले.
अर्थशास्त्र व वाणिज्य शाखेच्यावतीने स्थानिक लोक महाविद्यालय येथे ‘नोटाबंदीचे परिणाम’ या विषयावर राज्यस्तरीय चर्चासत्र घेण्यात आले. यावेळी बीजभाषक म्हणून खांदेवाले बोलत होते.
चर्चासत्राचे उद्घाटन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी केले. अध्यक्षस्थानी लोक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ. गजानन कोटेवार होते. मंचावर ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ. किशोर सानप, संस्था सचिव प्रकाश भोयर, माजी प्राचार्य अमृत येऊलकर, माजी प्राचार्य माधव ठाकरे, शिवकुमार रोडे, प्रा.डॉ. राजीव जाधव होते. अतिथी परिचय प्रा. सुनील पाटणे यांनी तर प्रास्ताविक प्राचार्य डॉ. पुष्पा तायडे यांनी केले. सदर चर्चासत्र तीन सत्रात घेण्यात आले.
पुढे बोलताना डॉ. श्रीनिवास खांदेवाले म्हणाले, विमुद्रीकरणाचा समाजावर फार प्रतिकुल परिणाम झाला. ही बाब केंद्रीय अर्थमंत्री यांनी सुद्धा मान्य केली आहे. ज्यासाठी नोटबंदीचा निर्णय घेतला, जसे काळा पैसा बाहेर काढणे, बनावट नोटा बंद करणे हे उद्देश खरोखर सफल झाले का, कारण काळा पैसा मिळविणारे आणि नकली नोटा तयार करणारे यात शक्कल लढवितात. यासाठी संस्कृती व लोकांची मानसिकता बदलविणे फार महत्वाचे आहे. नोटाबंदीचा रोजगारावर परिणाम झाला. उत्पादन ठप्प झाले. उत्पादन प्रक्रिया गुंतागुंतीची आहे. त्याप्रमाणे नोटबंदी सुद्धा गुंतागुतीची आहे. गरजेनुसार परिस्थिती बदलविली पाहिजे. परंतु त्याचा पूर्व अभ्यास असावा. गरीब आणि सामान्य माणसाच जगणं कठीण होऊ नये एवढेच सरकारने लक्षात घ्यावे. लोकांनीही आपल्या गरजा बदलवून नवीन संस्कृती निर्माण करावी, असे खांदेवाले यांनी सांगितले.
यानंतर प्रा.डॉ. राजीव जाधव, प्रा. अतुल फिरके, डॉ. विवेक चव्हाण यांनी लिहिलेल्या ‘सांख्यिकी आणि व्यावसायिक गणित’ या पुस्तकाचे विमोचन कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांचे हस्ते करण्यात आले.
चर्चासत्रात दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रात डॉ. अंजली कुळकर्णी व डॉ. तुषार चौधरी यांनी नोटाबंदीचा अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रावर होणाऱ्या परिणामांवर चर्चा केली. डॉ. राजकुमार शर्मा, डॉ. रंजना लांजेवार, डॉ. वर्षा गंगणे तसेच अर्थशास्त्र व वाणिज्य अभ्यासक्रमातील प्राध्यापकांनी यावेळी शोधनिबंध सादर केले. या सत्राच्या अध्यक्ष डॉ. स्रेहा देशपांडे होत्या. यावेळी मान्यवरांनी विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले.
समारोपीय कार्यक्रम डॉ. गजानन कोटेवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. प्राचार्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. मंचावर प्राचार्य डॉ. पुष्पा तायडे, संयोजक प्रा. डॉ. राजीव जाधव होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ. विश्वनाथ बेताल यांनी तर आभार प्रा. डॉ. सुचित्रा पाटणे यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. साहुरकर, प्रा.डॉ. सुरकार, प्रा. वाळके, प्रा.डॉ. भिमनवार, प्रा. मानकर, प्रा. सोनुरकर, प्रा. पिंपळे, प्रा. गणराज, प्रा. बहादुरे व कर्मचारी यांनी सहकार्य केले. चर्चासत्राकरिता विदर्भातील विविध महाविद्याल्याचे प्राध्यापक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)