आर्वी आगारातील भंगार गाड्या बदला
By Admin | Updated: November 28, 2015 03:10 IST2015-11-28T03:10:37+5:302015-11-28T03:10:37+5:30
आगाराच्या बसेसची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. कित्येक वर्षापासून आर्वी मंडळाला नवीन बसेस देण्यात आलेल्या नाही.

आर्वी आगारातील भंगार गाड्या बदला
नव्या बसेसची मागणी : प्रवास यातनामय
आर्वी : आगाराच्या बसेसची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. कित्येक वर्षापासून आर्वी मंडळाला नवीन बसेस देण्यात आलेल्या नाही. त्यामुळे सध्या आर्वी आगारातील बसेस सलाईनवर आहेत. त्या कधी कुठे व केव्हा बंद पडणार याचा नेम राहिला नाही. त्यामुळे आर्वी आगाराला काही नव्या गाड्या देण्याची मागणी प्रवाशांच्या वतीने करण्यात येत आहे.
आर्वी हे आर्वी-आष्टी व कारंजा हे तीन तालुके मिळून उपविभागाचे स्थान म्हणून ओळखल्या जाते. आर्वी तालुक्यात एकूण २२२ गावे असून या गावखेड्यातून व बाहेरगावाहून येथे ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्या तुलनेत बसेसची संख्या मात्र कमी पडत असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
सध्या आर्वी आगारातील बसेसची अवस्था दयनीय झाली असून त्या कशाबशा रस्त्यावर प्रवासी घेवून धावत आहे. याचा नेमका फायदा खासगी प्रवासी वाहनांना मिळत आहे. त्यातही परिवहन मंडळाच्या गाड्या उशिरा व विलंबाने सुटत असल्याने गाड्या पकडण्यासाठी आगारात प्रवाशांची एकच झुंबड उडते. त्यामुळे कित्येक वर्षांपासून आर्वी आगाराला नवीन बसेसची प्रतीक्षा आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोईसाठी आर्वी आगाराला नवीन बसेस देण्याची मागणी प्रवाशांच्या वतीने करण्यात येत आहे.
आर्वी आगाराच्या आर्वी कुऱ्हा मार्गे अमरावती बसफेऱ्या मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु या मार्गावर धावणाऱ्या बसेसची अवस्था अत्यंत दयनिय झाली आहे. त्या मार्गात कुठेही बंद पडत असल्याने याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे.(तालुका प्रतिनिधी)