वर्षभरातच त्याच्या जीवनात घडले परिवर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 21:50 IST2018-01-18T21:50:29+5:302018-01-18T21:50:39+5:30
सेवाग्राम येथे वास्तव्यास असलेला व पूर्णत: व्यसनाधिन इसम जिल्हा पोलीस अधीक्षक व कन्यारत्न कल्याणकारी प्रोत्साहन समितीच्या पुढाकाराने अवघ्या वर्षभरात सुधारला. ही काल्पनिकता नव्हे तर वास्तवात घडलेला प्रकार आहे.

वर्षभरातच त्याच्या जीवनात घडले परिवर्तन
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सेवाग्राम येथे वास्तव्यास असलेला व पूर्णत: व्यसनाधिन इसम जिल्हा पोलीस अधीक्षक व कन्यारत्न कल्याणकारी प्रोत्साहन समितीच्या पुढाकाराने अवघ्या वर्षभरात सुधारला. ही काल्पनिकता नव्हे तर वास्तवात घडलेला प्रकार आहे.
सेवाग्राम येथे बळजबरीने पैसे हिसकावणे, अवैध दारू विकणे, मद्यधुंद अवस्थेत गुंडगिरी करणे, दहशत माजविणे असे काम करणाऱ्या इसमाचे परिवर्तन करण्याचे काम जिल्हा पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. व कन्यारत्न समितीचे संस्थापक डॉ. आनंद ढोबळे यांच्या पुढाकाराने झाले. त्याच्या तीन सहकाºयांनीही सुधारणेबाबत शपथ घेतली आहे. यापुढे सेवाग्राम गावात कुठेही अवैध व्यवसाय, गुंडगिरी, छेडछाड करणार नाही व होऊ देणार नाही, ही जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. सहा महिन्यांपूर्वी स्टॅम्प पेपरवर असे शपथपत्र त्यांनी तयार करून दिले. त्याच्यातील या परिवर्तनाचे स्वागत करताना सदर इसमाचा रविवारी हनुमान मंदिराच्या प्रांगणात सत्कार करण्यात आला. उदरनिर्वाहाचे साधन म्हणून तीन एकर जमीन देण्याचे डॉ. ढोबळे यांनी जाहीर केले. पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांच्या निवासस्थानी सोमवारी त्याचा सत्कार केला गेला. अध्यक्षस्थानी उमरेडच्या पर्यावरणवादी कार्यकर्त्या प्रा.डॉ. प्रज्ञा गिरडकर तर अतिथी म्हणून प्रा. रजनी सातपुते, अॅड. ऋतुजा पळसपगार, डॉ. विजया बालपांडे, नारायण झोरे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सरपंच रोशना जामलेकर यांनी केले तर आभार स्मिता जोशी यांनी मानले.
व्यसनाधीनांना सभेत पाठवा
व्यसनी खर्रा, गुटखा, मद्यपी, तंबाखू आदी खाणाऱ्या युवक, पुरूष, महिला यांना अपमानीत न करता सभेसाठी पाठवा, अशी विनंती डॉ. ढोबळे यांनी या बैठकीत केली. यावेळी देह व नेत्रदानाच्या अर्जाचे नि:शुल्क वितरण करण्यात आले.