‘गांधी को कैसे पढा जाये’ हेच मोठे आव्हान
By Admin | Updated: August 26, 2016 02:07 IST2016-08-26T02:07:19+5:302016-08-26T02:07:19+5:30
गांधीला वेगळ्या दृष्टीकोणातून समजण्याची आणि वाचण्याची गरज आहे. ‘गांधी को कैसे पढा जाये’, हे मोठे आव्हान आहे.

‘गांधी को कैसे पढा जाये’ हेच मोठे आव्हान
मनोज कुमार : ‘चला घडू या! देशासाठी’ या युवा श्रमसंस्कार शिबिराचा समारोप
सेवाग्राम : गांधीला वेगळ्या दृष्टीकोणातून समजण्याची आणि वाचण्याची गरज आहे. ‘गांधी को कैसे पढा जाये’, हे मोठे आव्हान आहे. गांधी विचाराचा होत असलेला ऱ्हास आणि दुरूपयोग चिंतेचा विषय आहे. भौतिक व बाजारू मूल्यांना येत असलेले महत्त्व यामुळे गांधीला नव्या दृष्टीने बघण्याची गरज आहे, असे मत महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय गांधी विद्यापीठाचे निदेशक डॉ. मनोज कुमार यांनी व्यक्त केले.
गांधींच्या २०१९ ला होणाऱ्या १५० व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमांचा एक भाग म्हणून नई तालीम समिती आणि गांधी स्मृती व दर्शन समिती राजघाट नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने १९ ते २३ आॅगस्ट दरम्यान नई तालीम आश्रम परिसरात ‘चला घडू या! देशासाठी’ युवा श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पाच दिवसाच्या निवासी शिबिरात वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम या पाच जिल्ह्यातील ५३ महाविद्यालयीन, चळवळीतील आणि सामाजिक कार्याच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
समारोपीय कार्यक्रमात मगन संग्रहालयाच्या अध्यक्षा डॉ. विभा गुप्ता यांनी गांधी समजून घ्यायचा असेल तर गतीची आणि विकासाची संकल्पना समजून घ्यावी लागेल. अति गतीमय विकासामुळे समाजातील अनेक घटक बाहेर फेकले जातात. कारागिर, लहान शेतकरी, कलाकार, मजूर वंचित होत जातात. त्यांना समजून घेण्याची गरज आहे. गतीमध्ये हा समाजाचा मोठा घटक वेगळा होतो व फक्त थोड्यांच्या वाट्याला सर्व येते. त्यामुळे समाजात आक्रोश निर्माण होतो. तो कधी हिंसात्मक पवित्रा घेईल, सांगता येत नाही. तेव्हा सांस्कृतिक, जीवन मूल्य जोपासणे गरजेचे आहे, असे संगितले.
डॉ. सुगन बरंठ यांनी ग्रामविकास, ग्रामसभा व ग्रामस्वराज्य याचा अर्थ स्पष्ट करीत युवकांची भूमिका, कार्यदिशा किती महत्त्वाची आहे, हे सांगितले. प्रा. प्रदीप दासगुप्ता यांनी विज्ञान व वैज्ञानिक पद्धतीने चिकित्सा करीत विवेकाने सत्य समजून घेतले पाहिजे. गांधी, आंबेडकर, मार्क्स यांचे तत्वज्ञान समग्रतेने समजण्याची गरज आहे, असे सांगितले. डॉ. उल्हास जाजू यांनी स्वत:च्या जीवनानूभव व प्रसंगातून वेदनेचे नाते असेल तर कुठल्याही व्यवसायात असो, तुमच्यातील माणूस जागा असतो आणि तो प्रकट असतो, असे सांगितले. संचालन पुसदकर व अनुश्री दोडके यांनी केले तर आभार स्वाती दूधकोहळे यांनी मानले. शिबिराला शिवचरणसिंग ठाकूर, पवन भार्ई, रूपेश कडू, विनय करूळे, प्राजक्ता पुसदकर माथनकर आदींनी सहकार्य केले.(वार्ताहर)
ग्राम विकासाच्या पैलूंवर चर्चा
शिबिरात समूह चर्चा, फिल्म शो, स्लाईड शो, मैदानी व बौद्धिक खेळ, संवादात्मक व्याख्यान, श्रमदान, श्रमकार्य, नाट्य प्रस्तुती, सादरीकरण, चळवळीची व प्रेरणादायी गाणी, सफाई आणि कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक निर्मूलन, सांस्कृतिक कार्यक्रम आदी माध्यमातून गांधींच्या विचारांचा आणि त्यांच्या रचनात्मक कार्याचा परिचय करून देण्यात आला. ग्राम विकासाच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यात आली. मार्गदर्शकांनीही भाषण न करता संवाद आणि स्वत:च्या जीवानुभवाच्या आधारे मांडणी केली.
डॉ. प्रवीण खैरकार यांनी युवकातील बदलती व अस्थिर मानसिकता, डॉ. माधुरी झाडे यांनी जैविक व सामाजिक लिंग भेदामुळे विकासाच्या प्रक्रियेत येणारे अडथळे, प्रभाकर पुसदकर यांनी स्पेस व डोक्यातील शिपाई संकल्पना, सुषमा शर्मा यांनी नई तालिमची शिक्षण पद्धती, दिनकर चौधरी यवतमाळ यांनी महिला सक्षमीकरण व युवकांची भूमिका तर विवेक कुमार दिल्ली यांनी समितीच्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली.