केंद्रप्रमुख व शिक्षकाचा वाद पोलिसात
By Admin | Updated: March 20, 2016 02:14 IST2016-03-20T02:14:15+5:302016-03-20T02:14:15+5:30
तालुक्यातील करंजी (काजी) येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व केंद्र प्रमुखाचा वाद शनिवारी सेवाग्राम पोलीस ठाण्यात पोहोचला.

केंद्रप्रमुख व शिक्षकाचा वाद पोलिसात
अदखलपात्र गुन्ह्याची नोंद : ग्रामस्थानी केंद्रप्रमुखाला घातला घेराव
वर्धा : तालुक्यातील करंजी (काजी) येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व केंद्र प्रमुखाचा वाद शनिवारी सेवाग्राम पोलीस ठाण्यात पोहोचला. यात केंद्रप्रमुख सुनील पावडे याने शिक्षक योगेश बुरांडे व ग्रामस्थांनी मिळून घेराव घालत मारहाण केल्याचा आरोप करीत तक्रार दाखल केली.
याबाबत ग्रामस्थांनी व शिक्षकाने केंद्रप्रमुख सुनील पावडे हे नेहमीच असे प्रकार करीत असल्याचे सांगितले. याबाबत पावडे ज्या ठिकाणी कार्यरत होते, त्या प्रत्येक ठिकाणी त्याच्यामार्फत असे प्रकार घडल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, शिक्षक योगेश बुरांडे हे सकाळी ६.२५ वाजता शाळेत गेले. यानंतर सकाळी ७ वाजताच्या दरम्यान केंद्रप्रमुख सुनील पावडे शाळेला भेट देण्याकरिता आले. त्यांनी शिक्षक हजेरी पुस्तिका तपासून विद्यार्थी हजेरी मागविली. बुरांडे यांनी ती हजेरी पुस्तिका त्यांना दिली. हजेरी पुस्तिकेवर काही विद्यार्थ्यांना गैरहजर दाखविले होते.
हजेरी पुस्तिकेची चौकशी करताना पावडे यांनी अचानक बुरांडे यांना शिवीगाळ करणे सुरू केले. यावेळी शाळेच्या इतर शिक्षिका वनकर, साठोणे तेथे हजर होत्या; मात्र केंद्र प्रमुखांनी शिक्षकांना फसविण्यासाठी कट रचल्याचा आरोप शिक्षकाने केला. यावेळी पावडे यांना शिक्षकांनी विचारणा केली असता त्यांनी पत्नी व भावाला भ्रमणध्वनीवरून शाळेतील शिक्षक मला मारहाण करीत असल्याचे सांगितले. याची माहिती गावात पोहोचताच ग्रामस्थांनी शाळेत गर्दी केली. यावेळी शाळेत पावडे जोर जोरात शिवीगाळ करीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
शाळेची प्रार्थना सुरू होताच सर्व शिक्षक उपस्थित झाले; मात्र केंद्रप्रमुख आतच होते. ते स्वत:चे डोके टेबलवर आपटत असल्याचे ग्रामस्थांनी व शिक्षकांनी पाहिले. केंद्र प्रमुखाने स्वत:ची प्रकृती बिघडल्याचे सांगताच ग्रामस्थांनी गावातील डॉक्टरांना बोलविले. यावेळी वैद्यकीय तपासणी केली असता त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात आले. काही वेळातच त्यांची पत्नी पोलिसांना घेऊन शाळेत दाखल झाली. यामुळे पावडे यांचे हे कृत्य पूर्वनियोजित असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला असून चौकशीची मागणीही केली आहे.(तालुका प्रतिनिधी)
केंद्र प्रमुखाच्या अनेक तक्रारी
केंद्र प्रमुख सुनील पावडे यांच्या अनेक तक्रारी वरिष्ठांकडे असल्याची माहिती शिक्षण विभागातून देण्यात आली आहे. याकडे वरिष्ठांकडून दुर्लक्ष करण्यात आले. त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक शाळेत तक्रारी आहेत. केंद्र प्रमुखाच्या वागणुकीबाबत विविध ग्रामपंचायतींनी ठराव घेऊन त्यांना बदलविण्याची मागणीही वारंवार केलेली आहे. शाळेतील मुख्याध्यापकांना ते पैशाची मागणी करीत असल्याचा आरोप त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या शाळेतील मुख्याध्यापकांनी केलेला आहे. पावडे यांची पत्नी शिक्षिका म्हणून झाडगाव (बेलगाव) येथे आहे तर त्यांचा भाऊ आर्वीला वास्तव्यास आहे. गावकऱ्यांनी केंद्र प्रमुखाला घेराव घालताच अर्ध्या तासात पत्नी व त्यांचा भाऊ घटनास्थळी दाखल झाले. यामुळे हा पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप ग्रामस्थ व शिक्षकांनी केला आहे. यावर शिक्षण विभागाकडून होणाऱ्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष आहे.