सिमेंट रस्त्यावरील ‘तो’ झरा झाला बंद, दुरूस्तीचे काम सुरू

By Admin | Updated: July 9, 2015 02:12 IST2015-07-09T02:12:45+5:302015-07-09T02:12:45+5:30

गत दोन महिन्यांपासून सिमेंट रस्त्याच्या मधोमध पाण्याचा झरा वाहत होता.

On the cement road, he stopped 'barking', repairing work | सिमेंट रस्त्यावरील ‘तो’ झरा झाला बंद, दुरूस्तीचे काम सुरू

सिमेंट रस्त्यावरील ‘तो’ झरा झाला बंद, दुरूस्तीचे काम सुरू

वृत्ताची दखल : पाण्याचा अपव्यय थांबणार
सेलू : गत दोन महिन्यांपासून सिमेंट रस्त्याच्या मधोमध पाण्याचा झरा वाहत होता. याबाबत लोकमतने बुधवारी वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची नगरपंचायतीने दखल घेत सदर नळ जोडणी बंद करण्यात आली आहे. यामुळे रस्त्यावरील पाण्याचा झरा बंद झाला आहे.
सेलू येथील मेडिकल चौकातून घोराडकडे जाणाऱ्या मार्गावर घरगुती नळ जोडणीच्या लोखंडी नळीला छिद्र पडले होते. यातून सकाळ-सायंकाळ तास-दीड तास मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत होता. याकडे नगर पंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत होते. शिवाय रस्त्याच्या मधातच पाण्याचे कारंजे उडत होते. याकडे लोकमतने लक्ष वेधताच नगर पंचायतमध्ये कार्यरत कर्मचारी प्रशांत रहागडाले यांनी त्वरित दखल घेत ती नळ जोडणी बंद करण्यासाठी कामाला लावल्याचे मजूराने सांगितले.
या नळाची चौकशी केली असता ती घरगुती वापराची नळ जोडणी असली तरी बरेच दिवसांपासून वापरात नसल्याचे सांगण्यात आले. वर्दळीच्या रस्त्यावर त्या नळ जोडणीची लोखंडी नळी वाहनाच्या वर्दळीमुळे फुटली असल्याचे सांगण्यात येते. रस्त्याच्या मधोमध उडणारे कारंजे बुधवारी बंद झाल्याने रस्त्यावरून आवागमन करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
शहरात अन्यत्र कुठे अशा नळ जोडण्या आहे काय, याचा शोध घेतला जाणार असल्याचेही एका कर्मचाऱ्याने सांगितले. नगर पंचायत प्रशासनाने वृत्ताची दखल घेत दुरूस्ती केल्याने तुर्तास पाण्याचा अपव्यय थांबला आहे.(शहर प्रतिनिधी)

Web Title: On the cement road, he stopped 'barking', repairing work