गावकऱ्यांना सिमेंट मिश्रित तांदूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2015 02:01 IST2015-07-29T02:01:41+5:302015-07-29T02:01:41+5:30
सेलू (काटे) येथील स्वस्त दुकानातून गावकऱ्यांना सिमेंट मिश्रित तांदूळ मिळत आहे. यामुळे येथील नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.

गावकऱ्यांना सिमेंट मिश्रित तांदूळ
स्वस्त धान्य दुकानातून वाटप सुरूच : ग्रामस्थांचा जीव धोक्यात
वायगाव (निपाणी) : सेलू (काटे) येथील स्वस्त दुकानातून गावकऱ्यांना सिमेंट मिश्रित तांदूळ मिळत आहे. यामुळे येथील नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. याची तक्रार वरिष्ठांकडे करण्यात आली असली तरी त्यांच्याकडून यावर कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही.
या संदर्भात वरिष्ठांना विचारणा केली असता पुरवठा विभागामार्फतच पुरविण्यात आलेल्या तांदूळात सिमेंट आले आहे. यामुळे ते धान्य नागरिकांना वितरीत न करता ते परत करण्याच्या सूचना देण्यात आल्या; मात्र भाड्याच्या पैशाचा अतिरिक्त भुर्दंड पडत असल्याने दुकान मालकाने तो परत न करता नागरिकांना वितरीत केल्याचे सांगण्यात येत आहे.
नागरिकांना मोफत धान्य पुरविण्याकरिता शासनाच्यावतीने विविध योजना राबविण्यात येत आहे. सर्व धान्य स्वस्त धान्य दुकानातून देण्याचा दंडक आहे. यानुसार गावाकऱ्यांना धान्य पुरविण्यात येत आहे. सेलू (काटे) येथील लक्ष्मण वाकडे यांच्या स्वस्त धान्य दुकानात लाभार्थ्यांना देण्याकरिता तांदळाचा साठा पुरविण्यात आला आहे. आलेल्या या तांदळामध्ये सिमेंट असल्याचे निदर्शनास येताच ग्रामस्थांनी सेलू (काटे) येथील सरपंचाला गाठले. सरपंचाने स्वस्त धान्य दुकानाचे मालक लक्ष्मण वाकडे यांना विचारणा केली असता त्यांनी बोलण्यास टाळाटाळ केली. यावर सरपंचांने वाकडे यांना लाभार्थ्यांना दिलेले मिश्रीत धान्य परत घेवून दुसरे देण्याची मागणी केली; मात्र वाकडे यांनी नकार दिला.
दुकानातून सिमेंट मिश्रित तांदूळ आल्याने गावातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याची माहिती वरिष्ठांना देण्यात आली असली तरी कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. धान्य दुकानदाराना धान्य परत करण्याच्या सूचना असताना त्याने गावकऱ्यांना धान्य देण्याचा निर्णय घेतला. याला वरिष्ठांचे अभय असल्याची चर्चा गावात जोर धरत आहे.(वार्ताहर)