बापंूच्या आश्रमावर ‘सीसीटीव्ही वॉच’

By Admin | Updated: October 2, 2015 06:43 IST2015-10-02T06:43:54+5:302015-10-02T06:43:54+5:30

सबंध जगाला अहिंसेची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम येथील आश्रमातून चार वर्षांपूर्वी चष्म्याची चोरी

CCTV watch on father's ashram | बापंूच्या आश्रमावर ‘सीसीटीव्ही वॉच’

बापंूच्या आश्रमावर ‘सीसीटीव्ही वॉच’

वर्धा : सबंध जगाला अहिंसेची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम येथील आश्रमातून चार वर्षांपूर्वी चष्म्याची चोरी झाली होती. संपूर्ण देशभर गाजलेल्या या प्रकरणामुळे आश्रम प्रतिष्ठाणलाही धक्का बसला होता. यामुळेच आश्रम परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले जावे, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. तब्बल चार वर्षांनी ही अपेक्षा पूर्ण झाली असून सेवाग्राम आश्रमात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यामुळे आता आश्रम परिसरावर ‘सीसीटीव्हीचा वॉच’ असणार आहे.
जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या व सत्याच्या मार्गाने चालण्याचा धडा शिकविणाऱ्या महात्मा गाधींच्या सेवाग्राम आश्रमातच चोरी झाली होती. शिवाय आश्रम परिसरात प्रेमी युगूलांचेही प्रमाण वाढले होते. यामुळे तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. सदर कॅमेऱ्यांसाठी खासदार निधीचा वापर करण्यात आला आहे. खासदार रामदास तडस यांच्या निधीतून सेवाग्राम आश्रम परिसरात सात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यासाठी सात ते आठ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. आश्रमाचे प्रवेश द्वार, बापूकुटी परिसर, आदिनिवास, आद्य आदिनिवास, गोशाळा परिसर, महादेव कुटी आणि कार्यालयासमोर हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांमुळे संपूर्ण आश्रम परिसरावर लक्ष ठेवणे शक्य झाले आहे.
महात्मा गांधी आश्रम परिसरात शांतता असते. याचाच फायदा घेत प्रेमी युगूलही येथील झाडांखाली निवांत बसलेले आढळत होते. काही परिसरात चाळे करतानाही आढळून आले होते. यावर नियंत्रण मिळविण्यासाठीही सीसीटीव्ही कॅमेरे अत्यंत गरजेचे झाले होते. आश्रम प्रतिष्ठाणने तत्सम मागणीही लोकप्रतिनिधींकडे केली होती. यावरून खासदार तडस यांच्या निधीतून हे कॅमेरे बसविण्यात आलेत. चष्मा चोरी प्रकरणानंतर चार वर्षांनी हा होईना आश्रम परिसरात कॅमेरे लावण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहे. सीसीटीव्हीच्या वॉचमुळे आश्रम परिसरावर लक्ष ठेवणे शक्य झाले असून संपूर्ण दर्शनार्थींची नोंद टिपणेही शक्य होणार आहे.(कार्यालय प्रतिनिधी)

गांधी जयंतीसाठी सेवाग्राम आश्रम सज्ज
शुक्रवारी महात्मा गांधी यांची जयंती साजरी होत आहे. यासाठी सेवाग्राम आश्रम परिसर सज्ज करण्यात आला आहे. गांधी जयंतीनिमित्त हजारो दर्शनार्थी आश्रमाला भेटी देणार आहेत. ही बाब लक्षात घेऊन आश्रम परिसराची रंगरंगोटी करण्यात आली आहे. झाडांच्या बुंध्याशी बांधलेल्या ओट्यांना रंग देण्यात आला असून प्रवेशद्वारे व फलकांचीही रंगरंगोटी करण्यात आली आहे.
आश्रम परिसरात असलेल्या जुना बगिचा दुरूस्त करण्यात आला असून नवीन बगिचाची निर्मिती करण्यात आली आहे. या बागेमध्ये विविध प्रकारच्या फुलझाडांची लागवड करण्यात आली आहे. आश्रमाला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी रांजण ठेवण्यात आले आहेत. शुक्रवारी जयंतीनिमित्त कार्यक्रम असल्याने संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला आहे.
महात्मा गांधी आश्रमात करण्यात आलेल्या या व्यवस्थापनामुळे परिसराचे सौंदर्य आणि रमनियता आणखीच फुलली आहे.

दारूबंदीसाठी प्रयत्न
सेवाग्राम आश्रम परिसरात नसली तरी गावात मोठ्या प्रमाणात दारूविक्री होते. गांधीजींच्या नावाने जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली आणि जवळच दारूविक्री होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यामुळे १५० ते २०० महिलांना संघटीत करून सेवाग्रामला दारूमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी गावकऱ्यांनाही सहभागी करून घेतले जात आहे. आश्रम प्रतिष्ठाणच्या पुढाकारामुळे लवकरच गाव दारूमुक्त होईल.

१५० व्या जयंतीची पूर्वतयारी
४२ आॅक्टोबर २०१९ मध्ये महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला देशभरातील मान्यवर हजेरी लावणार आहेत. यामुळे त्याची तयारी आतापासूनच करण्यात येत आहे. आश्रम परिसराची देखरेख चोख करण्यात येत असून विविध सुविधा पुरविण्याचा प्रयत्न राहणार आहे.

शुक्रवारी महात्मा गांधी जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी आश्रम परिसर सुसज्ज करण्यात आला आहे. खासदार निधीतून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. रंगरंगोटी करण्यात आली असून २ आॅक्टोबर २०१९ रोजी होणाऱ्या १५० व्या जयंती कार्यक्रमाची ही पूर्वतयारी होय.
- जयवंत मठकर, अध्यक्ष, महात्मा गांधी आश्रम प्रतिष्ठाण, सेवाग्राम.

Web Title: CCTV watch on father's ashram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.