सीसीआयकडे ३० कोटींचे चुकारे थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 05:00 IST2020-06-04T05:00:00+5:302020-06-04T05:00:14+5:30

हिंगणघाट तालुक्यात सीसीआयने आतापर्यंत १८ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२० पर्यंत या एक महिन्याच्या कालावधीत हिंगणघाटला तीन केंद्रातून तर वडनेरमध्ये एका केंद्रावर तीन हजाराच्यावर शेतकऱ्यांकडून जवळपास ५५ हजार क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. याच कापसाचे जवळपास ३० कोटी रुपये सीसीआयकडे थकीत असून शेतकऱ्यांना त्यांचे चुकारे अद्याप मिळालेले नाही.

CCI balance payments of 30 crores | सीसीआयकडे ३० कोटींचे चुकारे थकले

सीसीआयकडे ३० कोटींचे चुकारे थकले

ठळक मुद्देकापूस उत्पादकांची वाढली चिंता : लॉकडाऊनचा बळीराजाला जबर फटका

भास्कर कलोडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : शासनाद्वारा हमी भावात खरेदी केलेल्या ३० कोटींपेक्षा जास्त कापसाचे चुकारे दीड महिन्यांपासून सीसीआयकडे थकीत आहे. तर पंधरा दिवसांपासून कापूस खरेदी बंद असल्याने घरी पडून असलेल्या कापसाचे करायचे काय या विचाराने शेतकरी सध्या आहे. शासनाने त्वरित थकीत चुकारे देत कापूस खरेदी करून करावी अशी मागणी आहे.
हिंगणघाट तालुक्यात सीसीआयने आतापर्यंत १८ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२० पर्यंत या एक महिन्याच्या कालावधीत हिंगणघाटला तीन केंद्रातून तर वडनेरमध्ये एका केंद्रावर तीन हजाराच्यावर शेतकऱ्यांकडून जवळपास ५५ हजार क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. याच कापसाचे जवळपास ३० कोटी रुपये सीसीआयकडे थकीत असून शेतकऱ्यांना त्यांचे चुकारे अद्याप मिळालेले नाही. यावर्षी खुल्या बाजारात कपाशीचे क्विंटलमागे ४,८०० रुपये दर असताना केंद्र शासनाकडून हमीदर ५ हजार ५५० रुपये देण्यात आला आहे. क्विंटलमागे हजार रुपयापर्यंत फरक पडत असल्याने यावर्षी शेतकºयांचा सीसीआयकडे हमी दरात कापूस विक्री करण्यासाठी ओढा आहे.
सुरुवातीला सीसीआयद्वारे खरेदी केलेल्या कापसाचे चुकारे पाच ते सात दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत होते; पण नंतर हा कालावधी वाढत जाऊन आता तब्बल दीड महिन्यापासून शेतकऱ्यांना कापसाचे चुकारे सीसीआयकडून देण्यात आलेले नाही. सीसीआयने कापूस खरेदी सुरू केली तेव्हा उच्च प्रतीच्या कपाशीला क्विंटलमागे ५,५५० रुपये दर दिला जात होता.
नंतर हाच दर ५,४५० रुपयांवर स्थिरावला. तालुक्याचा विचार करता कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे येथे १९ मार्च पासून सीसीआयची कापूस खरेदी बंद केली आहे. मागील पंधरा दिवसांपासून सीसीआयची कापूस खरेदी बंद असून गत वर्षी याच कालावधीत ६५ हजार १२२ क्विंटल कापसाची खरेदी झाली होती. मध्यतरी झालेल्या अवकाळी पावसासह वादळीवाºयामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पूर्वीच शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशातच कापसाचे चुकारे वेळीच मिळत नसल्याने तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

काहींच्या बँक खात्यात जमा झाली रक्कम
१८ फेब्रुवारीपर्यंत कापूस विक्री केलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांचे चुकारे त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत. मात्र, १८ मार्चपर्यंत या एक महिन्याच्या कालावधीत सुमारे तीन हजार शेतकऱ्यांनी विकलेल्या ५५ हजार क्विंटल कापसाचे ३० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्याप जमा झालेले नाही.

कांही कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कागदपत्रातील त्रुटी, काहींचे एस बँके द्वारा व्यवहार, संगणकीय लिंक, तसेच लॉक डाऊन आदी अडचणीमुळे शेतकऱ्यांना कापसाचे चुकारे मिळण्यास विलंब झाला आहे. परंतु २९ फेब्रुवारीपर्यंतचे चुकारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बुधवारपर्यंत तर उर्वरित शेतकऱ्यांनाही लवकरच कापसाचे चुकारे देण्यात येईल.
- दीपक पाटोले, केंद्र प्रभारी प्रमुख, सीसीआय, हिंगणघाट.

Web Title: CCI balance payments of 30 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.