पशुसंवर्धन केंद्राची वाताहत
By Admin | Updated: July 17, 2014 00:16 IST2014-07-17T00:16:26+5:302014-07-17T00:16:26+5:30
स्वातंत्र्यपूर्व काळापासून नागपूर पशुसंवर्धन विभागाद्वारे कारंजा(घा.) तालुक्यातील हेटीकुंडी येथे गवळाऊ गार्इंचे संवर्धन आणि सरंक्षण व्हावे या दृष्टीने पशुसंवर्धन केंद्र उभारण्यात आले.

पशुसंवर्धन केंद्राची वाताहत
वर्धा : स्वातंत्र्यपूर्व काळापासून नागपूर पशुसंवर्धन विभागाद्वारे कारंजा(घा.) तालुक्यातील हेटीकुंडी येथे गवळाऊ गार्इंचे संवर्धन आणि सरंक्षण व्हावे या दृष्टीने पशुसंवर्धन केंद्र उभारण्यात आले. पण शासकीय उदासीनता आणि अधिकारी अधिकारी वर्गाचे दुर्लक्ष यामुळे या केंद्राची वाताहत झाली आहे.
२७ जानेवारी १९८० रोजी तत्कालीन राज्यमंत्री बाळकृष्ण लिंबाजी पाटील यांच्या हस्ते या पशुसंवर्धन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. त्या काळात या केंद्राची ख्याती सर्वदूर पोहोचली होती़ एकेकाळी या केंद्रामध्ये जातीवंत गवळाऊ गायींची पैदास, संगोपन योग्य प्रकारे केले जात आहे. त्यावेळी या केंद्रात हजारो गाई होत्या. त्यामुळे भरपूर प्रमाणात दूध, दही आणि तुपाचा पुरवठा येथून केला जात होता़
जिल्ह्यातील उत्कृष्ठ पशुसंवर्र्धन केंद्र म्हणून या केंद्राचा लैकिक होता. दुरून दुरून लोक आणि पशुसंशोधक या ठिकाणाला भेट देऊन येथील पशु संवर्धनाची माहिती घेत असत. त्यावेळेस येथे पशुप्रदर्शन भरवून बक्षिसेही दिली जात असे. त्या माध्यमातून लोकांना पशुसंवर्धनाचे धडे दिले जात असे. येथील शेतातच गार्इंचे खाद्य भाजीपाला विविध पिके घेतली जात असे. त्यासाठी लागणारे अर्थसहाय्य सरकारी माध्यमातून मिळत होते. त्याकाळी हजारो रूपये खर्च करून हे केंद्र चालू केले, परंतु कालांतराने शासनाची कृपादृष्टी संपली आणि कर्मचारी वर्गही देगा हरी पलंगावरी या अंर्तभावात काम करायला लागला. कर्मचारी संख्या कमी झाली. त्यामुळे हळूहळू गार्इंची दैना सुरू झाली. अर्थसहाय्य मिळत नाही अशा सबबी पुढे करीत गार्इंच्या चाऱ्यात भ्रष्टाचार व्हायला लागला. या कारणाने एकेकाळी जिल्ह्याची शान असलेल्या हेटीकुंडी येथील पशुसंवर्धन केंद्राचे जुनै वैभव सरून केंद्राची दुरवस्था होत गेली आणि प्रकल्प अधोगतीला आला.
एकेकाळी जिल्ह्याचे भूषण असलेला हा पशुसंवर्धन प्रकल्प आजघडीला खूपच जीर्ण झाला असून अखेरच्या घटका मोजत आहे. सध्या इथे कोणाचीही देखरेख नाही. एखादा कर्मचारी नजरेस पडतो. त्यांच्या चेहऱ्यावरील उदासीन भाव त्यांच्या व्यथा व्यक्त करतात. गायींना वैरण नाही. त्यांची योग्य स्वच्छता नाही. इमारतीचीही दुरवस्था झाली आहे. त्या खचत चालल्या आहे. अनेक साहित्य भंगार झाले आहे.
आज येथे केवळ बोटावर मोजण्याइतक्या गवळाऊ गायी आहेत. मरणाची वाट पहात त्या कशातरी जगत आहे. येथील शेतीकडेही दुर्लक्ष झाल्याने तीदेखील नापिक झाली आहे. अवती भवती झुडपाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. व्यवस्थेच्या नावावर येथे केवळ तीन कर्मचारी आणि एक कुत्रा आहे. वरिष्ठ कर्मचारी, आणि अधिकारी एखाद्या वेळेत या पशुसंवर्धन केंद्रावर फिरकत असतात.
एकीकडे पशुसंवर्धनाच्या नावावर कोट्यवधी रूपये उधळून नवनवे प्रकल्प उभे केले जात आहे. परंतु जे जुने प्रकल्प कार्यान्वित आहे त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे या केंद्राच्या दुरवस्थेला जबाबदार असणाऱ्यांना जाब विचारून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी परिसरातील शेतकरी व नागरिक करीत आहे.
गायीला शेतकरी माता मानतात. त्यामुळे त्यांच्या डोळ्यासमोरच या प्रकल्पामध्ये त्यांची अवहेलना केल्या जात आहे. त्यामुळे शासनाने या केंद्राकडे पुन्हा एकवार लक्ष घालून या केंद्राचे पुनरुज्जीवन करावे अशी मागणी परिसरातील शेतकरी, पशुपालक आणि पर्यावरणवादी व पशुसंशोधक करीत आहे. त्याचप्रकारे अशा प्रकारे चालू असलेले कोणतेही केंद्र बंद पडणार नाही याची काळजी कर्मचारी आणि जनतेने घेणे आवश्यक आहे.
आज हा प्रकल्प चालविण्यात काय समस्या येत आहे याचा विचार करून, नवीन तंत्रज्ञानाद्वारे संलग्न व्यवसाय सुरू करून त्यावर उपाय योजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. हा प्रकल्प बंद करण्याचा विचार दूर सारून त्याची पूनर्बांधणी आवश्यक आहे. गतकाळाचे वैभव परत येवून हा प्रकल्प विदर्र्भाचा भूषण ठरावा यासाठी शासनस्थरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे. सोबतच येथील वनवैभवही परत आणने आवश्यक असल्याचे बोलल्या जात आहे. (शहर प्रतिनिधी)