लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅशलेस व्यवहारांना प्राेत्साहन देण्यासाठी उचललेल्या पावलांवर पाऊल ठेवून शहरासह जिल्ह्यातील पोस्ट कार्यालयांनी आता यूपीआय क्यूआर कोडद्वारे रक्कम स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जिल्ह्यातील २८ पोस्ट कार्यालयांत आता क्यूआर कोडद्वारे रक्कम स्वीकारण्यात येत आहे. मागील काही दिवसांत अनेकांनी या सुविधेचा लाभ घेतल्याची माहिती मुख्य पाेस्ट मास्तर अविनाश अवचट यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पाचशे, हजार रुपयांच्या नोटा बंद केल्या. डिजिटल व कॅशलेस व्यवहारांना प्राेत्साहन देण्याचे आवाहन केले. देशातील राष्ट्रीयीकृत व खासगी, तसेच सहकारी बॅंका व वित्त संस्थांनी त्यांच्या या प्रयत्नाला साजेसे धोरण स्वीकारले. टपाल विभाग याबाबत काहीसा मागे होता. मात्र, आता पोस्ट विभागाने कात टाकली आहे. टपाल विभागाने आता यूपीआय क्यूआर कोड स्कॅन करून स्पीड पोस्ट, रजिस्टर्ड पोस्ट, मनी ऑर्डर, पार्सल बुकिंग यासाठी लागणारे सेवाशुल्क ग्राहकांना भरता येऊ लागले आहे. या उपक्रमामुळे टपाल कार्यालयात गेल्यानंतर कर्मचाऱ्यांकडून सुटे पैसे देण्याचा होणारा आग्रह, त्यातून होणारे वाद, हे सारे आता इतिहासजमा होणार आहे. त्याबरोबरच छोट्या-छोट्या व्यवहारांसाठी गुगल पे, फोन पे, करण्याची सवय लागलेल्या ग्राहकांना आता तशाच पद्धतीने क्यूआर कोड स्कॅन करून व्यवहार करणे शक्य होणार आहे, हेही मात्र तितकेच खरे.
टपाल खात्याची डाक सेवा हीच जनसेवा हे बोधवाक्य आहे. दीडशे वर्षापेक्षा अधिक काळ जगातील सर्वांत मोठे टपाल सेवेचे नेटवर्क म्हणून भारतीय टपाल कार्यालयाची ओळख आहे. बदलत्या काळात स्पीड पाेस्ट, बिझनेस पार्सल, बिझनेस पोस्ट, पोस्ट मनी ट्रान्सफर या अत्याधुनिक सेवा सुरू केल्या आहेत. पोस्टाने बॅंक सेवाही सुरू केली आहे. आता क्यूआर कोड स्कॅन करून सेवा शुल्क जमा करण्याची नवी सुविधा टपाल खात्याने सुरू केली आहे. जिल्ह्यातील २८ पोस्ट कार्यालयात ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. अविनाश अवचट, मुख्य पोस्ट मास्तर टपाल कार्यालय, वर्धा
अनेकांनी घेतला सुविधेचा लाभ... n पोस्ट कार्यालयात आता क्यूआरकोड स्कॅनद्वारे सेवाशुल्क आकारण्याची सुविधा उपलब्ध करुन दिल्याने ग्राहकांनाही दिलासा मिळाला आहे. अनेक ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घेतला असून टपाल विभागाने कात टाकली आहे हे मात्र खरे.