दारूबंदी महिला मंडळे झालीत निष्क्रिय
By Admin | Updated: July 21, 2014 23:59 IST2014-07-21T23:59:47+5:302014-07-21T23:59:47+5:30
स्थानिक पोलीस ठाण्यांतर्गत अनेक गावांत दारूबंदी महिला मंडळांची स्थापना करण्यात आली होती़ गावातील दारूच्या भट्ट्या व दुकाने या महिलांनी बंद करून अवैध दारूविक्रेते व उत्पादकांच्या

दारूबंदी महिला मंडळे झालीत निष्क्रिय
पोलिसांचे अहसकार्य : दारूविक्रीला उधाण
सेलू : स्थानिक पोलीस ठाण्यांतर्गत अनेक गावांत दारूबंदी महिला मंडळांची स्थापना करण्यात आली होती़ गावातील दारूच्या भट्ट्या व दुकाने या महिलांनी बंद करून अवैध दारूविक्रेते व उत्पादकांच्या मुसक्या बांधल्या होत्या़ पोलीस यंत्रणा आपल्या पाठीशी आहे, हा विश्वास या महिलांना असल्याने त्यांनी बेधडक हे कार्य केले; पण विश्वास ठेवलेले पोलीसच विश्वासघातकी निघाल्याची जाणीव झाल्यावर या मंडळांना अखेरची घरघर लागली़ आता एक-दोन गावे वगळता अन्यत्र दारूबंदी महिला मंडळेच दिसत नाहीत़
सेलू पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या अनेक गावांत महिलांनी पुढाकार घेत दारूभट्ट्या उद्ध्वस्त करण्याचे काम केले़ मद्यपिंची धिंड काढली़ स्वत:चा पती दारूडा असेल तर त्याला रात्रभर घराबाहेर अन्न-पाण्याविना ठेवण्याचे धाडस केले़ या धडाडीमुळे दारू उत्पादक व विक्रेते वठणीवर आले़ अनेकांना पोलीस ठाण्यात भाकरी मोडाव्या लागल्या; पण पोलिसांना हे नको होते़ त्यांच्या वरकमाईचा प्रश्नच या अवैध धंद्यावर होता़ महिला मंडळांविरूद्ध पोलिसांनीच सुरूंग पेरले़ दारूविक्रेत्यांचे मनोबल वाढवून महिला मंडळातील कार्यकर्त्यांची बेअब्रू करण्याचा सल्ला दिला़ ज्या महिलांनी पोलिसांवर विश्वास ठेवला, त्यांनीच झुप्या मार्गाने घात केला़ यानंतर महिलांच्या अंगावर अवैध व्यावसायिक चालून जाऊ लागले़ पोलिसांत प्रकरण गेल्यावर उलट महिला मंडळांनाच दमदाटी केली जात होती़ असे अनेक प्रकार यापूर्वी घडले़ रणचंडीकेचा अवतार धारण करणाऱ्या महिलांची शक्ती क्षीण करण्याचे पालक पोलिसांनीच केले़ यामुळे महिला मंडळे आपोआपच गारद झाली आणि पोलिसांचे फावले़
महिला मंडळांच्या क्षीण शक्तीकडे कुणी पाहिले नाही़ आता याच मंडळांना विश्वासात घेत दारूमुक्तीच्या लढ्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक झाले आहे़ पोलिसांनी यासाठी मानसिकता बदलणे गरजेचे आहे़ महात्मा गांधी यांच्या नावाला कलंकित करणाऱ्या दारूबंदीचा फज्जाच झाला आहे़ याचे कुणालाच वाईट वाटत नाही़ पोलिसांनी मनावर घेतले तर दारूचा व्यवसाय करण्याची कुणीच हिंमत करणार नाही; पण तसे होत नाही़ सेलू व परिसरात खुलेआम नसली तरी लपून-छपून दारू विकली जाते़ पोलिसांना सर्व ठिय्ये माहिती आहे़ एकेका दारूविक्रेत्याच्या घरी प्रत्येक महिन्यात किमान पाच पोलीस जातात व प्रत्येक जण एक हजार रुपये घेऊन येतात, ही सत्यता आहे़ एकट्या सेलू शहरातही ठाणेदारांनी पोलिसांना विचारणा केली तर दारूविक्रेत्यांकडून लाच घेणारे अनेक जण आढळतील़ पोलीस दादागिरी करीत असतील तर ठाणेदाराबद्दलही लोक संशय व्यक्त करतात़ ठाणेदार उल्हास भुसारी यांच्याकडून अपेक्षा असल्यामुळे त्यांनी दारूबंदी महिला मंडळे पुनर्जीवित करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी होत आहे़(तालुका प्रतिनिधी)