जातीवाचक शिवीगाळ प्रकरणात ‘त्या’ महिलेला अटक करा
By Admin | Updated: December 15, 2015 04:13 IST2015-12-15T04:13:20+5:302015-12-15T04:13:20+5:30
जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी राणी धाकतोडविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती कायद्यान्वये कारवाई करून तिला अटक

जातीवाचक शिवीगाळ प्रकरणात ‘त्या’ महिलेला अटक करा
वर्धा : जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी राणी धाकतोडविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती कायद्यान्वये कारवाई करून तिला अटक करण्यात यावी, अशी मागणी पवनार येथील ग्रामस्थांसह बहुजन रयत परिषदेने पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना सोमवारी दिलेल्या निवेदनातून केली.
मंगळवारी सायंकाळी जय ऊर्फ दर्शन रामेश्वर मुंगले याला धाकतोडने जबर मारहाण करीत जातिवाचक शिवीगाळ केली. यावेळी तक्रारकर्ता मुंगले यांच्यासोबत विजय वानखेडे, विठ्ठल पडधान, शेखर लोखंडे हे देखील होते. या तिघा साथीदारांच्या समवेत मुंगले यांच्याशी हा प्रकार झाला. घटनेविषयी मुंगले सेवाग्राम पोलीस ठाण्यात तक्रार देण्याकरिता गेले असता ठाण्यातील कार्यरत कर्मचाऱ्याने दूरध्वनीवरुन राणी धाकतोेड यांच्याशी संपर्क साधत त्यांना बोलावले व तक्रार झाल्याविषयी माहिती दिली. अगोदर त्यांची तक्रार नोंदवत नागरिकांना तब्बल दोन तास ठाण्यास बसवून ठेवत धाकतोड यांच्या तक्रारीवरून पहिले विनयभंगप्रकरणी खोटी तक्रार दाखल केल्याचा आरोप गावकऱ्यांचा आहे. धाकतोड यांनी गावातील अनेकांविरुद्ध खोट्या तक्रारी दाखल केल्या असल्याचेही मुंगले यांनी निवेदनात म्हटले आहे. दाखल केलेले खोटे गुन्हे त्वरित मागे घेऊन गैरअर्जदार राणी धाकतोड यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी मुंगले यांच्यासह बहुजन रयत परिषदेने पोलीस अधीक्षकांना सादर केलेल्या निवेदनातून केली आहे.(शहर प्रतिनिधी)