रुग्णाचा मृत्यू झाल्यास सरपंच, ग्रामसेवक,तलाठ्यांवर होणार कार्यवाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:00 AM2021-05-05T05:00:00+5:302021-05-05T05:00:11+5:30

को-मार्बिट पॉझिटिव्ह रुग्णाला गृहविलगीकरणात न ठेवता त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्याची जबाबदारीही सरपंच, ग्रामसेवक व तलाठी यांचीच राहील. या सूचनांचे पालन न केल्यास आणि सदर रुग्णाचा मृत्यू झाल्यास गावातील सरपंच, ग्रामसेवक आणि तलाठी या तिघांवरही कार्यवाही केली जाईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ३ मे रोजी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.

In case of death of the patient, action will be taken against Sarpanch, Gram Sevak and Talathas | रुग्णाचा मृत्यू झाल्यास सरपंच, ग्रामसेवक,तलाठ्यांवर होणार कार्यवाही

रुग्णाचा मृत्यू झाल्यास सरपंच, ग्रामसेवक,तलाठ्यांवर होणार कार्यवाही

googlenewsNext
ठळक मुद्देमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा आदेश : संघटनांमध्ये नाराजीचा सूर, विमा कवच देण्याची होताहेत मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरिता गृहविलगीकरणात असलेल्या गंभीर कोरोनाबाधित रुग्णांना तालुक्यातील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्याची जबाबदारी सरपंच, ग्रामसेवक तसेच तलाठी यांच्यावर राहील. तसेच या सूचनांचे पालन न केल्यास गावातील रुग्णाचा मृत्यू झाला तर गावातील सरपंच, ग्रामसेवक आणि तलाठी यांच्यावर कार्यवाही केली जाईल, असा आदेश जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आला आहे. या आदेशामुळे तिन्ही संघटनांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शहरानंतर आता गावागावामध्येही कोरोना पोहोचल्याने तालुक्यातील सर्व गावात आशा, अंगणवाडी सेविका व पोलीस पाटील यांनी गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांना दैनंदिन भेटी द्याव्या. पल्स ऑक्सिमीटरने त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासावे व शिक्षकानेही गावाला भेट देऊन आशा, अंगणवाडी सेविका व पोलीस पाटील यांच्याकडून रुग्णांची माहिती गोळा करून ती माहिती कार्यक्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्राला सादर करावी. 
त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रावरून तालुक्याला व तालुक्यावरून सर्व माहिती एकत्रित करून जिल्ह्याला सादर करावी. सर्व को-मार्बिट असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती आशा व अंगणवाडी सेविकांनी गावातील सरपंच, ग्रामसेवक व तलाठी यांना त्वरित द्यावी. त्यानंतर सरपंच, ग्रामसेवक व तलाठी यांनी पॉझिटिव्ह रुग्णांना जवळच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करावे. 
को-मार्बिट पॉझिटिव्ह रुग्णाला गृहविलगीकरणात न ठेवता त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्याची जबाबदारीही सरपंच, ग्रामसेवक व तलाठी यांचीच राहील. या सूचनांचे पालन न केल्यास आणि सदर रुग्णाचा मृत्यू झाल्यास गावातील सरपंच, ग्रामसेवक आणि तलाठी या तिघांवरही कार्यवाही केली जाईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ३ मे रोजी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची जबाबदारी इतरांवर लादण्याचा हा प्रकार असून तो अन्यायकारक असल्याचे मत तिन्ही संघटनांकडून व्यक्त होत आहे.
 

सरपंच हा जनप्रतिनिधी आहे, तो शासनाचा नोकर नाही, अशा प्रकाराचे आदेश काढून सरपंचावर अन्याय केला जात आहे. सरपंचाला एक कोटीचे सुरक्षा विमा कवच देऊन सरपंच व उपसरपंच यांना लसीकरण करावे तसेच यापुढे शासनाच्या अपयशाचे खापर सरपंचाच्या माथी मारू नये.
- प्रा. धर्मेंद्र राऊत,  जिल्हाध्यक्ष सरपंच संघटना.
 

कोविड-१९ च्या काळात गावातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची सर्वच जबाबदारी ग्रामसेवकांकडे सोपविण्याचा प्रकार सुरुवातीपासूनच सुरू आहे. ग्रामसेवक गावात योग्यरीत्या काम करीत असूनही त्यांना अद्याप शासनाने विम्याचे सुरक्षा कवच दिलेले नाही. अशा आदेशाने मनोबल वाढविण्याऐवजी खच्चीकरण होत आहे.
- हेमंत भोमले,   जिल्हाध्यक्ष ग्रामसेवक संघटना.
 

कोरोनाकाळात फ्रंटलाईन वर्कर म्हणून सर्व तलाठी कार्य करीत आहेत. तलाठ्यांना आरोग्याबाबत काही प्रशिक्षण दिलेले नाही. त्यामुळे आरोग्य विभागाची जबाबदारी तलाठ्यांवर सोपविणे हा अतिरेक होईल. तलाठी महसूल विभागाचा कर्मचारी असल्याने त्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश मान्य राहील. 
- अशोक आंबेकर,  जिल्हाध्यक्ष तलाठी संघटना.

 

Web Title: In case of death of the patient, action will be taken against Sarpanch, Gram Sevak and Talathas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.