कार चोरट्याला नागपुरातून अटक
By Admin | Updated: May 4, 2017 00:42 IST2017-05-04T00:42:59+5:302017-05-04T00:42:59+5:30
सेलू येथून चोरी गेलेल्या कारचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेने प्राप्त माहितीवरून चोरट्यास नागपूर येथून अटक केली.

कार चोरट्याला नागपुरातून अटक
गुन्हे शाखेची कारवाई : चोरीतील कार जप्त
वर्धा : सेलू येथून चोरी गेलेल्या कारचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेने प्राप्त माहितीवरून चोरट्यास नागपूर येथून अटक केली. त्याच्याकडून चोरीस गेलेली कार जप्त करण्यात आली. ही कारवाई बुधवारी करण्यात आली.
ज्ञानेश्वर वामन गोहणे रा. हिंगणा, जि. नागपूर हे १९ एप्रिल रोजी त्यांच्या मित्राच्या कार क्र. एमएच ३१ सीएम ९३०० ने कान्होलीबारा येथून सेलू येथे परिवारासह लग्नाला आले होते. गाडी मंगल कार्यालयाच्या बाजूला लॉक करून कार्यालयात गेले. काही वेळाने कार्यालयाच्या बाहेर आले असता गाडी दिसली नाही. यामुळे त्यांनी सेलू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून सेलू पोलिसांसह गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला.
सेलू येथून चोरीस गेलेली कार सराईत गुन्हेगार विवेक डोफे, रा. जोगी नगर नागपूर याने चोरल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. सदर माहितीचा मागोवा घेत गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर येथे जाऊन विवेक डोफे यास शिताफीने ताब्यात घेतले. त्याला विचारणा केली असता सदर कार त्यानेच चोरल्याची कबुली दिली. शिवाय कार राहत्या घराजवळ लपवून ठेवल्याचे सांगितले. यावरून चोरीस गेलेली कार किंमत ४ लाख ६ हजार रुपये जप्त करीत चोरट्यात अटक करण्यात आली.
सदर आरोपी नागपूर येथील अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून तो सराईत गुन्हेगार आहे. अजनी पोलिसांनी त्याला तडीपार घोषित केले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. निर्मलादेवी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक पराग पोटे, नरेंद्र डहाके, सचिन खैरकार, तुषार भुते, जगदीश डफ, मुकेश येल्ले यांनी पार पाडली.(कार्यालय प्रतिनिधी)