अर्ज भरण्यासाठी गादी घेऊनच पोहोचले उमेदवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 00:41 IST2019-03-09T00:40:48+5:302019-03-09T00:41:03+5:30
ग्रा.पं. निवडणुकांचा रणसंग्राम सुरु झाला आहे. यावर्षीची अर्ज भरण्याची प्रक्रिया ही अनेकांसाठी किचकट व त्रासदायक ठरत आहे. विशेषत: आॅनलाईन अर्ज दाखल करावयाचे असल्यामुळे आॅनलाईन सेंटरवरही मोठी गर्दी झाली आहे.

अर्ज भरण्यासाठी गादी घेऊनच पोहोचले उमेदवार
देवकांत चिचाटे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नाचणगाव : ग्रा.पं. निवडणुकांचा रणसंग्राम सुरु झाला आहे. यावर्षीची अर्ज भरण्याची प्रक्रिया ही अनेकांसाठी किचकट व त्रासदायक ठरत आहे. विशेषत: आॅनलाईन अर्ज दाखल करावयाचे असल्यामुळे आॅनलाईन सेंटरवरही मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे आपला अर्ज कालावधीच्या आत भरता यावा म्हणून काही उमेदवारांनी गादी घेऊनच आॅनलाईन सेंटर गाठले. शिवाय मुक्कामही ठोकला.
देवळी तालुक्यातील ६३ ग्रा.पं.पैकी ४६ ग्रा.पं. च्या सार्वत्रिक तर एका ग्रा.पं.ची पोट निवडणूक येत्या २४ मार्चला होऊ घातली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ५ मार्च ते ९ मार्चपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. उमेदवारीसाठी आॅनलाईन अर्ज भरावयाचा असल्याने इंटरनेट सेंटरवर गर्दी वाढली आहे. दुपारच्या सुमारास लिंक राहत नाही किंवा नेटची स्पीड कमी राहत असून रात्रीच स्पीड जास्त राहते, असा समज असल्यामुळे दिवस-रात्र इंटरनेट केंद्र सुरु असल्याचे दिसून येते. एका उमेदवाराला अर्ज भरताना जवळपास १९ मुद्द्यांची पुर्तता करावी लागत आहे. त्यातही इंटरनेटच्या कमी स्पीडमुळे अर्ज भरण्यासाठी विलंब होत आहे. त्यामुळे उमेदवार आता गादी घेऊन इंटरनेट सेंटरवर पोहोचत आहेत. रात्रभरही अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु राहत असल्याने उमेदवार तेथेच झोपी जातात. ठरलेल्या यादीनुसार क्रमांक आला की त्यांना झोपेतून जागे करीत त्यांचा अर्ज भरण्याची कार्यवाही सुरु केली जात आहे. सध्या इंटरनेट सेंटरवर दिवसरात्र एक करुन उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु असल्याने रात्रीही दिवसाचाच अनुभव येत आहे. मात्र, शनिवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतीम दिवस असल्याने या किचकट प्रणालीत कितींचे अर्ज दाखल होतात व किंतींच्या अपेक्षेवर पाणी फेरतात, याकडेही स्थानिक राजकीय मंडळींचे लक्ष लागले आहे.
ग्रामपंचायतीला सुगीचे दिवस
ग्रामपंचायतींना एरवी कर वसुलीकरिता विविध उपाययोजना कराव्या लागतात. उमेदवारी अर्ज भरण्याकरिता उमेदवाराकडे ग्रामपंचायतचा कर थकीत नसावा, अशी अट असल्याने आता ईच्छुकांकडून कर भरल्या जात आहे. तसेच इतरही प्रमाणपत्राकरिता शुल्क वसुल केल्या जात असल्याने ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातही वाढ होताना दिसत आहे.