वाटणीपत्रातील अटी रद्द करा
By Admin | Updated: September 6, 2014 02:17 IST2014-09-06T02:17:44+5:302014-09-06T02:17:44+5:30
१०० रूपयाच्या स्टॅम्प पेपरवर शेतीचे वाटणीपत्र करण्यासाठी लावण्यात आलेल्या जाचक अटी रद्द करण्याची मागणी कृषी ग्राहक संरक्षण समिती व किसान ...

वाटणीपत्रातील अटी रद्द करा
समुद्रपूर : १०० रूपयाच्या स्टॅम्प पेपरवर शेतीचे वाटणीपत्र करण्यासाठी लावण्यात आलेल्या जाचक अटी रद्द करण्याची मागणी कृषी ग्राहक संरक्षण समिती व किसान अधिकार अभियान संघटनेमार्फत जिल्हाधिकारी वर्धा यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
१०० रूपयाच्या स्टॅम्प पेपरवर आपसी वाटणीपत्र करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत २६ जून २०१४ ला काढण्यात आलेल्या परिपत्रकात काही जाचक अटी असून त्यामध्ये वडिलोपार्र्जित जमीन वारसामध्ये वाटणी करता येणार आहे. परंतु स्वकष्टार्जित जमिनीचे वाटणीपत्र करता येणार नसल्याचे नमूद करण्यात आले होते. ही अट रद्द करून स्वकष्टार्जित जमिनीचे वाटणीपत्र सुद्धा १०० रूपयांच्या स्टॅम्प पेपरवर करण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
१०० रूपयाच्या स्टॅम्प पेपरवर तहसीलदारांसमोर वाटणीपत्र केल्यानंतर भविष्यात वाद उत्पन्न होऊन न्यायप्रविष्ट झाल्यास सदर वाटणीपत्र कोर्टात ग्राह्य धरल्या जाणार नाही. तसेच एक टक्का नोंदणी फी भरूनच वाटणीपत्र करावे. या परिपत्रकातील दोन्ही अटी रद्द करण्यात याव्या. कारण दोन साक्षीदार व तहसीलदार यांच्या समक्ष रीतसर वाटणीपत्र केल्यावर ते कोर्टात ग्राह्य धरलेच पाहीजे. तसेच शंभर रूपयांच्या स्टॅम्पवर वाटणीपत्र केल्यानंतर एक टक्का नोंदणी फी आकारणे सुसंगत नाही. त्यामुळे या दोन्ही अटी रद्द करण्यात याव्या, अशी मागणी यावेळी संघटनांच्या वतीने करण्यात आली.
१०० रूपयाच्या स्टॅम्प पेपरवर करण्यात आलेले वाटणीपत्र फेरफार करण्यासाठी तलाठ्याकडे हेक्टरी ५०० रूपये जमा करावे ही परीपत्रकातील अटसुद्धा शासनाच्या निर्णयाशी विसंगत असून ती रद्द करण्यात यावी तसेच जाचक अटी कमी करून सुधारित परिपत्रक जिल्हाधिकाऱ्यांनी काढावे, अशी मागणीही कृषी ग्राहक संरक्षण समिती व किसान अधिकार अभियान संघटनेमार्फत करण्यात आली.(शहर प्रतिनिधी)