कालवे, वितरिका सदोष; पाण्याचा अपव्यय

By Admin | Updated: November 2, 2015 01:41 IST2015-11-02T01:41:17+5:302015-11-02T01:41:17+5:30

धरणांतून पाणी सोडताना कालवे, वितरिकांची स्थिती तपासणे गरजेचे असते; पण तसे होत नाही.

Canals, distributors defective; Water wastage | कालवे, वितरिका सदोष; पाण्याचा अपव्यय

कालवे, वितरिका सदोष; पाण्याचा अपव्यय

रस्ते जलमय, पिकांचेही होतेय नुकसान : सफाई, दुरूस्तीसाठी निधीची कमतरता; शेतकऱ्यांची गोची
सेलू : धरणांतून पाणी सोडताना कालवे, वितरिकांची स्थिती तपासणे गरजेचे असते; पण तसे होत नाही. गत कित्येक वर्षांपासून कालवे, वितरिका दुरूस्त व साफ करण्यात आलेल्या नाही. यामुळे सोडलेले पाणी रस्ते आणि शेतांमध्ये पसरून नुकसान होत आहे. सध्या खरिपातील कपाशी, तुरी तसेच रबी हंगामाच्या तयारीसाठी पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी शेवटच्या टोकावर असलेल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसून रस्ते व शेतांमध्ये साचत असल्याचे दिसते. यामुळे पाण्याचाही अपव्यय होत आहे.
गत काही दिवसांपासून कालवे, वितरिकांमध्ये पाणी सोडण्यात आले आहे; पण साफसफाई करण्यात आली नाही़ यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. शेतांतही पाणी शिरत आहे़ परिसरातील रस्तेही जलमय होत आहे़ संबंधित प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने रस्ते, शेतांचे नुकसान होत आहे. संपूर्ण सेलू तालुक्यात हा प्रकार आढळून येत असल्याने खरोखरच शेतकऱ्यांना सिंचनाकरिता पाणी उपलब्ध होते काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
घोराड ते कोलगाव हा डांबरी रस्ता आहे़ या रस्ता व गावालगत वितरिका आहे़ गत काही वर्षांपासून बोर प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी वितरिकेच्या सफाईकडे दुर्लक्ष केले आहे. वितरिकेवरून पाणी वाहत असल्याने ते लगतच्या शेतात शिरते. यामुळे शेताला तलावाचे स्वरूप प्राप्त होऊन पिकांचे नुकसान होते. शेतातून वाहणारे पाणी रस्त्यावरही पसरत असल्याने रस्त्यांचीही दुरवस्था होत आहे. यात हजारो लिटर पाण्याचाही अपव्यय होत आहे. पाण्याचा अपव्यय होतो, त्या स्थळापासून अर्धा किमी अंतरावर बोर प्रकल्प, पाटबंधारे विभागाचे कार्यालय आहे. ही वितरिका पूर्णत: पाझरत असून वितरिकेला लागूनच असलेल्या घराशेजारी पाणी साचते. गतवर्षी याबाबतची तक्रारही करण्यात आली होती; पण त्यानंतरही वितरिकेची दुरूस्ती करण्यात आली नाही. बोरधरणातील पाण्याचा अपव्यय होऊ नये यासाठी वितरिकेची दुरूस्ती व साफसफाई करावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्य, ग्रा.पं. पदाधिकारी व शेतकऱ्यांनी केली होती; पण त्याकडेही दुर्लक्षच केले जात असल्याचे दिसते.
पंचायत समितीच्या सभेतही बोर, पंचधारा, मदन उन्नई आदी प्रकल्पांच्या वितरिकांच्या साफसफाईचा मुद्यावर चर्चा झाली; पण त्या चर्चेचे काहीही फलित झाल्याचे दिसत नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी दुरूस्तीसाठी निधी नसल्याने कामे कशी करावी, असा प्रश्न उपस्थित केला. यामुळे पाण्याचा अपव्यय पाटबंधारे विभाग कसा थांबविणार, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे़ पाटबंधारे विभागासह जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांसह ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे़(शहर प्रतिनिधी)

पाझरणाऱ्या कालव्यामुळे शेतकरी त्रस्त
तालुक्यातील बोरधरण पूर्ण होऊन सुमारे ५० वर्षे पूर्ण झालीत. धरणाच्या पाण्याने तालुक्यात हरितक्रांतीचे स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्यांना पाटबंधारे विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका बसत असल्याचे दिसून येते. मागील काही दिवसांपासून बोर धरणाचे पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे कालव्यातील पाणी पाझरत आहे. यामुळे शेतांचे नुकसान होत असल्याने रबीच्या पेरणीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे.
२०१३-१४ मध्ये कालव्यांच्या डागडुजीकरिता लाखो रुपयांचा निधी आला; पण अधिकाऱ्यांचा नियोजनशून्य कारभार व उदासीन धोरणामुळे कालव्याची कामे निकृष्ट झाल्याचा आरोप होत आहे. काही ठिकाणी नावापुरतेच काम करण्यात आले़ मुख्य कालव्यावरील गेटचीही दुरूस्ती करण्याचे सौजन्य संबंधित विभाग दाखवीत नाही. परिणामी, कालव्यातून पाणी पाझरून शेतकऱ्यांची शेती खराब होत असल्याच्या तक्रारी आहेत.
निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी त्रस्त आहे. यात शासनाचे दुर्लक्ष आणि पाटबंधारे विभागही सिंचनाची योग्य सोय करीत नसल्याने शेतकऱ्यांनी दाद कुणाकडे मागावी, हा प्रश्नच आहे. कालवे आणि वितरिकांची दुरूस्ती करून सिंचन सुविधा बळकट करणे गरजेचे आहे.

Web Title: Canals, distributors defective; Water wastage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.