पाचव्या वर्गाचे ‘परिसर अभ्यास’ पुस्तकच नाही
By Admin | Updated: July 29, 2015 02:00 IST2015-07-29T02:00:46+5:302015-07-29T02:00:46+5:30
येथील पंचायत समितीच्या प्रशासनाने पुस्तकांची मागणी नोंदविताना नावात गडबड केली.

पाचव्या वर्गाचे ‘परिसर अभ्यास’ पुस्तकच नाही
वर्धा पंचायत समितीतील प्रकार : मागणीच नोंदविली नाही; नव्या अभ्यासक्रमामुळे नुकसान
वर्धा : येथील पंचायत समितीच्या प्रशासनाने पुस्तकांची मागणी नोंदविताना नावात गडबड केली. परिणामी जि.प.च्या शाळेतील पाचव्या वर्गातील विद्यार्थ्यांना ‘परिसर अभ्यास’ पुस्तकच मिळाले नाही. अशात अभ्यासक्रम बदलल्याने १२७ शाळेतील विद्यार्थ्यांना त्रासाचा सामना करावा लागत आहे.
या संदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेला सूचना करण्यात आल्या असून येत्या आठवड्यात ही पुस्तके येणार असल्याचे पंचायत समितीच्यावतीने सांगण्यात आले आहे. असे असले तरी या शाळा सुरू झाल्याच्या दिवसापासून विद्यार्थ्यांना या पुस्तकातील अभ्यासक्रमापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
शाळा सुरू होण्यापूर्वी शासनाकडे पुस्तकांची मागणी करणे गरजेचे आहे. ही मागणी नोंदविताना समितीच्यावतीने पुस्तकाचे नाव विज्ञान पुस्तक असे टाकण्यात आले. परिणामी जिल्ह्यात परिसर अभ्यासाकरिता असलेले पुस्तक आले नाही. याचा फटका वर्धा पंचायत समितींतर्गत येत असलेल्या १२७ शाळांतील सुमारे ३ हजार विद्यार्थ्यांना या पुस्तकाअभावी राहावे लागत आहे. अभ्यासक्रम बदलल्याने विद्यार्थ्यांना काय शिकवावे व काय नाही या विवंचनेत शिक्षक आहेत. पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्याच्या गलथान कारभाराचा फटका मात्र विद्यार्थ्यांना सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.(प्रतिनिधी)