राज्य मार्गावरील केळझर टोल नाका अखेर बंद
By Admin | Updated: July 7, 2014 00:03 IST2014-07-07T00:03:04+5:302014-07-07T00:03:04+5:30
काही वर्षांपासून विरोधकांचा विरोध झुगारून सुरू असलेला येथील टोलनाका १ जुलैपासून अचानक बंद झाला. टोल नाक्याच्या कंत्राटाची मुदत १५ महिने शिल्लक आहे़ तत्पूर्वीच टोल नाका बंद

राज्य मार्गावरील केळझर टोल नाका अखेर बंद
यादीत नाव नव्हते : कंत्राटदार मागणार न्यायालयात दाद
केळझर : काही वर्षांपासून विरोधकांचा विरोध झुगारून सुरू असलेला येथील टोलनाका १ जुलैपासून अचानक बंद झाला. टोल नाक्याच्या कंत्राटाची मुदत १५ महिने शिल्लक आहे़ तत्पूर्वीच टोल नाका बंद करण्याचे आदेश दिल्याने संबंधित कंत्राटदार न्यायालयाचे दार ठोठावणार आहे़
महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाच्या अधिकारात हा टोल नाका आहे़ राज्यातील ४४ टोलनाके बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता़ या यादीमध्ये केळझर टोल नाक्याचा समावेश नव्हता़ यामुळे हा टोल नाका बंद होणार नाही, अशी अनेकांची समजूत होती; पण सोमवार ३० जून रोजी मध्यरात्री ११.५५ वाजता रस्ते विकास मंडळाचे अभियंता वऱ्हाडे टोल नाक्यावर आले़ तेथील व्यवस्थापकास अवघ्या पाच मिनीटांत टोल वसुली बंद करण्याचे आदेश दिले. काही काळ टोलवर कार्यरत कर्मचाऱ्यांनाही हे ऐकून धक्का बसला; पण लेखी आदेश दाखविल्यानंतर लगेच रात्री १२ वाजता टोल वसुली बंद करण्यात आली.
टोलवसुलीचे कंत्राट पल्लवी कन्स्ट्रक्शनच्या नावे व्यंकट बांगडीया व एल़बी़ मचिले यांनी मिळविला आहे. सदर कंत्राटाची मुदत सप्टेंबर २०१५ पर्यंत असून मुदतीच्या १५ महिन्यापूर्वीच टोल बंद केल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे कंपनीद्वारे सांगण्यात आले. काही महिन्यांपूर्वीच संबंधित कंपनीद्वारे टोल नाक्याची दुरूस्ती करण्यात आली होती़ यात मोठा खर्चही सदर कंपनीने केला; पण टोल नाका बंद करण्याचे आदेश आल्याने कंपनीचेही नुकसानच झाले आहे़(वार्ताहर)