एफसीआयकडून निकष डावलून तुरीची खरेदी
By Admin | Updated: February 28, 2017 01:09 IST2017-02-28T01:09:08+5:302017-02-28T01:09:08+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरू असलेल्या भारतीय खाद्य निगमच्या (एफसीआय) कर्मचाऱ्यांकडून तूर खरेदीत शेतकऱ्यांना निकषाच्या कैचीत पकडून ...

एफसीआयकडून निकष डावलून तुरीची खरेदी
वर्धेत पाडली खरेदी बंद : उपनिबंधकांच्या मध्यस्थीने निवळले प्रकरण; सेलूतही वैताग
वर्धा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरू असलेल्या भारतीय खाद्य निगमच्या (एफसीआय) कर्मचाऱ्यांकडून तूर खरेदीत शेतकऱ्यांना निकषाच्या कैचीत पकडून व्यापाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार होत असल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी खरेदी बंद पाडली. हा प्रकार सोमवारी दुपारी घडला. बाजार समितीत झालेल्या प्रकाराची माहिती तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यांनी प्रकरण शांत करण्याकरिता जिल्हा उपनिबंधक आणि तहसीलदारांना बाजार समितीत पाठविले. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने सदर प्रकरण निवळले.
यावेळी बाजार समितीच्या यार्डवर असलेली प्रत्येक शेतकऱ्याची तूर तपासणी करून ती खरेदी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. ज्यांची तूर नियमात बसत असेल त्यांच्या तुरीची खरेदी करण्यावर यावेळी मार्ग काढण्यात आला. यात जर नाफेडच्या कर्मचाऱ्याने पुन्हा निकष डावलले तर बजाज चौक परिसरात गाड्या आडव्या लावून रस्ता बंद आंदोलन करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला. तर उद्या मंगळवारपासून समितीच्या यार्डवर तुरीकरिता वेगळी व्यवस्था करून खुल्या ढिगातून भारतीय खाद्य निगमच्या कर्मचाऱ्यांनी ग्रेडींग करावे असा निर्णय घेण्यात आला. यात एफसीआयने तूर नाकारल्यानंतर ती व्यापारी खरेदी करू शकतात. यात शेतकऱ्यांचा वेळ आणि श्रम वाचेल असा निकष लावण्यात आला. यावेळी बाजार समितीचे सभापती श्याम कार्लेकर, जिल्हा उपनिबंधक कडू, सहायक उपनिबंधक जयंत तलमले, तहसीलदार मनोहर चव्हाण, नायब तहसीलदार बर्वे, समितीचे सचीव समीर पेंडके, खाद्य निगमचे सुनील सिंग यांच्यासह संचालक विजय बंडेवार, दत्ता महाजन यांची उपस्थिती होती.
शेतातील तुरी निघत असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीत गर्दी होत आहे. बाजारात असलेल्या दरापेक्षा खाद्य निगमकडून हमी भावात खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांची येथे गर्दी होत आहे. मात्र येथे शेतकऱ्यांची लूट होत असल्याचे समोर आले आहे. आज दुपारच्या सुमारास येथील ग्रेडर सुनील सिंग याने शेतकऱ्यांच्या तुरी निकषात बसत नसल्याचे म्हणत त्या परत करण्याचा सपाटा सुरू केला. याच काळात त्याच्याकडून सर्व नियम धाब्यावर बसवून एका व्यापाऱ्याची दर्जाहीन तूर खरेदी करण्यात आली. याची माहिती शेतकऱ्यांना होताच त्यांनी खरेदी बंद पाडली. सर्वांनी सभापती कार्लेकर यांच्या कक्षात धाव घेतली. झालेल्या प्रकाराची माहिती सचीव पेंडके यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी वेळीच प्रकरणाची दखल घेत उपनिबधंक कडू आणि तहसीलदार चव्हाण यांना घटनास्थळ गाठण्याच्या सूचना केल्या.
या दोन्ही अधिकाऱ्यांनी बाजार समिती गाठली. येथे शेतकऱ्यांनी आणलेली तूर खरेदी योग्य असल्याचे दिसून आले. यावरून ग्रेडर सुनील सिंग यांना सदर तूर खरेदी करण्याच्या सूचना करण्यात आल्या; मात्र त्यांच्याकडून निकषांचाच पाढा वाचल्या जात असल्याचे दिसून आले. अखेर कडू यांनी स्वत: तुरीची पाहणी करीत ती खरेदी योग्य असल्याचे म्हणत खरेदीच्या सूचना केल्या. (प्रतिनिधी)
ग्रेडरच्या मुजोरीने सारेच हैराण
बाजारात तूर घेवून आलेल्या शेतकऱ्यांना होत असलेल्या त्रासाचा उद्रेक होताच त्यांनी खरेदी बंद पाडली. यावेळी अनेकांकडून गे्रडरला त्याच्याकडून होत असलेला प्रकार योग्य नाही, असे समजावणीचा प्रयत्न होत होता; मात्र तो कोणाचेही ऐकत नसल्याचे दिसून आले. यामुळे येथे अनुचित प्रकार घडण्याचा संशय येताच पोलिसांनाही पाचारण करण्यात आले होते.
आमदारांनी जाणल्या तूर उत्पादकांच्या व्यथा
वर्धा- तुरीच्या भावात प्रचंड घसरण आल्याने शेतकरी तूर शासकीय खरेदी केंद्रावर हमीभावाच्या आशेने नेत आहे. मात्र या केंद्रावर शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सेलू येथील बाजार समितीच्या उपकेंद्रावर अयर समस्यांनी तूर उत्पादक घेरला असल्याची मिळताच आ. डॉ. पंकज भोयर यांनी सोमवारी दुपारी अचानक भेट देत पाहणी केली. यावेळी तूर उत्पादक शेतकऱ्यांशी आमदारांनी चर्चा करुन त्यांच्या समस्या जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत निर्देश दिले.
आमदाराने दिली सेलू बाजार समितीला आकस्मिक भेट
शेतकऱ्यांनी मांडल्या समस्या : सुविधा देण्याच्या केल्या सूचना
वर्धा : तूरीच्या भावात प्रचंड घसरण झाल्याने शेतकरी सरकारी तूर खरेदी केंद्रावर हमीभावात तूर विकण्यासाठी जात आहे. येथे आल्यावर शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. याबाबत आ.डॉ. पंकज भोयर यांना माहिती मिळताच सोमावरी दुपारी त्यांनी बाजार समितीला आकस्मिक भेट देऊन पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांसोबत आ. भोयर यांनी चर्चा करुन समस्या जाणून घेतल्या. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना सुविधा देण्याबाबत निर्देश दिले.
यंदा तूरीचे भरघोस उत्पन्न झाले आहे. मात्र तुरीच्या भावात घसरण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला. व्यापाऱ्यांकडून तुरीला हमीभावापेक्षा कमीभाव दिला जात आहे. त्यामुळे शेतकरी सरकारी तूर खरेदी केंद्रावर येतात. शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ नये यासाठी शासनाने एफसीआयच्या मार्फत तूर खरेदी सुरू केली आहे. सेलू बाजार समितीच्या उपकेंद्रावर आठ दिवसांपासून शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी आणली. मात्र शेतकऱ्यांना आठ दिवसांपासून ताटकळावे लागत आहे. बाजार समितीच्या यार्डवर टाकलेल्या तूरीच्या सुरक्षेची कोणतीही जबाबदारी संबंधित यंत्रणा घेत नाहीत. एकीकडे तूर खरेदी करण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे शेतकरी व्यथीत झाले.
दररोज बाजार समितीच्या यार्डवर शेकडो क्विंटल तूर विक्रीसाठी येत असताना एफसीआय केवळ दोनशे ते चारशे क्विंटलपर्यंत तूर खरेदी करीत आहे. या समस्येची माहिती आ. भोयर यांना मिळाल्यावर त्यांनी सेलू बाजार समितीला भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. शेतकऱ्यांनी खरेदीबाबत व्यथा मांडल्या. शेतकऱ्यांनी सांगितले की, एफसीआय मालाची खरेदी करीत आहे. माल पास करणे ही त्यांची जबाबदारी असून माल मोजणे व जमा करणे ही जबाबदारी विदर्भ मार्केटींग फेडरेशनची असते. यावर आ. भोयर यांनी एफसीआयचे अधिकारी मूर्ती, विदर्भ मार्केटींग फेडरेशनचे अधिकारी घोडेस्वार, तहसिलदार रविंद्र होळी, बाजार समितीचे उपसभापती रामकृष्ण उमाटे यांच्या उपस्थितीत बैठक बोलाविली. तसेच अधिकाऱ्यांना जाब विचारुन शेतकऱ्यांची तूर सर्वप्रथम खरेदी करावी. तूर खरेदीचे नियोजन करण्यात यावे. कुठलाही शेतकरी माल घेऊन परत जाणार नाही. शेतकऱ्यांच्या मालाची सुरक्षा करण्यात यावी, असे निर्देश दिले. सभेला भाजपाचे तालुका प्रमुख अशोक कलोडे, शहर प्रमुख वरुण दफ्तरी, विलास वरटकर, अंसार शेख, मुख्यमंत्री मित्र सदानंद वानखेडे, वासुदेव लिचडे, बंडू गव्हाळे, आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
मंगळवारपासून खुल्या बाजारात होणार ग्रेडींग
खरेदीदरम्यान शेतकऱ्यांना खाद्यनिगमच्या केंद्रावर जात तूर दाखवावी लागत आहे. यात तूर नाकारल्याने शेतकऱ्यांना पुन्हा ती पोत्यात भरण्यात अधिकचा आर्थिक भूर्दंड बसत होता. यामुळे मंगळवापासून येथील यार्डवर तुरीचे ढिग लावण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनी लावलेल्या या ढिगांजवळ ग्रेडर स्वत: येतील आणि ग्रेडींग करून खरेदी करतील असा तोडगा काढण्यात आला. यातही निकषात दूजाभाव झाल्यास ग्रेडरला जबाबदार धरण्यात येईल, असे उपनिबंधक कडू म्हणाले.
बाजारात शेतकऱ्यांनी आणलेल्या तुरी खरेदी करण्यायोग्य आहेत. त्या संबंधीत यंत्रणेणे परत करू नये. तसेच ग्रेडरने शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रकार करू नये. आजच्या प्रकाराचा अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात येईल.
- ए. बी. कडू, जिल्हा उपनिबंधक
ग्रेडरकडून होत असलेला हा प्रकार निंदनीय आहे. शेतकऱ्यांच्या सोईकरिता शासकीय केंद्रावर सर्वच सेवा समितीने दिली आहे. असे असताना शेतकऱ्यांना त्रास देणारा ग्रेडर बदलविण्याची मागणी करण्यात येईल.
- श्याम कार्लेकर, सभापती, बाजार समिती वर्धा
सेलू बाजार समितीत शेतकरी संतापले; पोलिसांना पाचारण
सेलू : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भारतीय खाद्य निगमच्यावतीने (एफसीआय) तूर खरेदी सुरू आहे. मात्र दररोज मनुष्यबळ अपुरे असल्याचे कारण सांगत नाममात्र खरेदी केल्या जाते. त्यामुळे तूर विक्रीला आलेला शेतकरी आठ ते दहा दिवस ताटकळत बसतो. आज शेतकऱ्यांच्या भावनेचा बांध फुटल्याने अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले.
बाजार समितीमध्ये एकसीआयच्यावतीने शासनाने निर्धारीत केलेल्या ५०५० रुपये प्रति क्विंटल भावाने तूर खरेदी केल्या जाते. एफसीआय आला विदर्भ कोआॅपरेटीव्ह मार्केटींग फेडरेशन कडून आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध होत नाही असे कारण सांगत केवळ नाममात्र शंभर-दोनशे क्विंटल दररोज तूर खरेदी करण्याचे नाटक केल्या जाते. बाजार समितीत दररोज पाचशे पेक्षा जास्त क्विंटल तूर विक्रीस घेवून शेतकरी येतात. मालाची खरेदी होत नसल्याने आठ ते दहा दिवस शेतकऱ्यांना माल विक्रीसाठी प्रतीक्षा करावी लागते. यामुळे शेतकऱ्यांची पंचाईत होत आहे. याकडे लक्ष देत कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. याकडे दुर्लक्ष झाल्यानेच आज उद्रेक झाला आहे. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने प्रकरण निवळल्याचे चित्र आहे.(तालुका प्रतिनिधी)
एफसीआय तूर खरेदीत संथगती शेतकरी वैतागले
एफसीआयला विदर्भ को-आॅपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशनने आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध केले नाही असे कारण सांगितले जाते. यात शेतकऱ्यांचे खूप हाल होत आहे. यात बदल होणे आवश्यक आहे. बाजार समितीकडून सर्वतोपरी मदत करण्यास कटीबध्द आहो.
- विद्याधर वानखेडे, सभापती सिंदी कृ.उ.बा. समिती.सेलू