फलकाविनाच धावतात बसेस

By Admin | Updated: September 5, 2014 00:02 IST2014-09-05T00:02:01+5:302014-09-05T00:02:01+5:30

आर्वी आगारातील अनेक बसेस भंगारावस्थेत आहे़ यातील अनेक बसेस कोणत्या गावाला जात आहेत, याबाबतचे फलकही राहत नाही़ बसेस फलकाविनाच धावत असल्याने प्रवाशांची तारांबळ उडते;

Buses without running | फलकाविनाच धावतात बसेस

फलकाविनाच धावतात बसेस

रोहणा : आर्वी आगारातील अनेक बसेस भंगारावस्थेत आहे़ यातील अनेक बसेस कोणत्या गावाला जात आहेत, याबाबतचे फलकही राहत नाही़ बसेस फलकाविनाच धावत असल्याने प्रवाशांची तारांबळ उडते; पण आर्वी आगाराला याकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याचे दिसून येते़
राज्य परिवहन महामंडळाची प्रत्येक बस कोणत्या स्थानकावरून कोणत्या स्थानकापर्यंत जाणार आहे़ ती कोणत्या मार्गाने व कोणत्या गावाहून जाणार आहे, याची प्रवाशांना स्पष्ट माहिती मिळावी म्हणून बसेसला गावाच्या नावाचे फलक दिले जातात़ प्रत्येक बस नामफलकासह धावावी, असा राज्य परिवहन महामंडळाचा नियमही आहे; पण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे या नियमाला हरताळ फासला जात आहे़ आर्वी आगाराच्या अनेक बसेस नामफलकाविनाच धावत असल्याचे दिसून येते़ यामुळे प्रवासी प्रत्येक बसपर्यंत धावत जातात. एसटी चालक व वाहकांना विचारणा करतात आणि आपल्या मार्गाची नाही म्हणून परत येतात.
यातही एसटीचे वाहक, चालक बरेच मुखजड असतात. एसटी कुठे चालली हे सांगण्याचे सौजन्यही ते दाखवित नाहीत़ यामुळे एसटी प्रवाशांना सुखासाठी की त्रासासाठी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ शिवाय आर्वी आगारातील बसेसचे वेळापत्रक अत्यंत अव्यावहारिक आहे़ एखाद्या मार्गावर विशिष्ट कालावधीत दहा-दहा बसेस जातात तर दुसऱ्या मार्गावर त्याच कालावधीत एकही बस धावत नाही. परिणामी, एका मार्गावरील बसेस रिकाम्या धावतात तर त्याचवेळी दुसऱ्या मार्गावरील प्रवाशांची आर्वी स्थानकावर तोबा गर्दी उसळते. एखादा त्रस्त प्रवासी चौकशी अधिकाऱ्यास विचारणा करण्यास गेल्यास सदर अधिकारी, गाडी आल्यावर लागेल, असे उत्तर देतात़ आगार व्यवस्थापक बस स्थानकावर कधीच उपस्थित राहत नाहीत़ त्यांना भेटायला कुठे जावे, हाही प्रवाशांकरिता प्रश्नच असतो़ चौकशी अधिकारी मी काहीच करू शकत नाही, यापेक्षा अधिक बोलत नसल्याने प्रवाशांची गोची होते़ परिणामी, प्रवाशांना ताटकळत बसण्याशिवाय पर्याय नसतो़
बस आली की धावणे आणि आपल्या मार्गाची आहे की नाही, याची शहानिशा झाली की पुन्हा कुठे तरी उभे राहणे, याशिवाय पर्याय राहत नाही़ बसस्थानकावर बांधकाम सुरू असल्याने प्रवाशांना उन्ह, वारा, पाऊस या संमीश्र वातावरणाचा सामना करावा लागतो़ सध्या व्यवस्थित उभे राहण्याकरिताही सुरक्षीत जागा नसल्याने त्रास सहन करावा लागतो़ या आगाराच्या अंदाजे ७५ टक्के बसेस भंगार झाल्या आहेत़ पावसात गळणे, खड्ड्यातून उसळल्यावर गेट उघडणे, अर्ध्या प्रवासात बंद पडणे आदी प्रकारांसह आता नामफलकाविनाच धावणाऱ्या बसेस प्रवाशांना नवीन डोकेदुखी ठरत आहे. आगाराच्या अव्यावहारिक शेड्यूलचे नमुनेदार उदाहरण द्यायचे झाल्यास दिवसा साडे दहा ते १२ वाजताच्या दरम्यान आर्वीकडून वर्धा व वरूड, आष्टी, मोर्शी या मार्गावर १० बसेस धावतात; पण त्याचवेळी आर्वीहून पुलगाव, यवतमाळ या मार्गाने एकही बस नाही़ या कालावधीत प्रवाशांना नाईलाजाने काळी-पिवळी या अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाने असुरक्षित प्रवास करावा लागतो़ महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे लक्ष देत ‘प्रवाशांच्या सेवेत’, हे एसटीचे ब्रीद सार्थकी लावावे, अशी मागणी होत आहे़(वार्ताहर)

Web Title: Buses without running

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.