आजपासून थांबणार आरती चौकात बसेस
By Admin | Updated: July 6, 2017 01:23 IST2017-07-06T01:23:14+5:302017-07-06T01:23:14+5:30
काही वर्षांपूर्वी शहरातल्या आरती चौकातील बसेसचा थांबा बंद करण्यात आला होता.

आजपासून थांबणार आरती चौकात बसेस
लोकमतचा पाठपुरावा : शिष्टमंडळाला वाहतूक पोलीस निरीक्षक व आगार व्यवस्थापकाचे आश्वासन
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा/घोराड : काही वर्षांपूर्वी शहरातल्या आरती चौकातील बसेसचा थांबा बंद करण्यात आला होता. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी व प्रवाशांना त्रास होतो. गुरुवारपासून हा थांबा पुर्ववत करणार असे आश्वासन आगार व्यवस्थापक व वाहतूक विभागाकडून देण्यात आल्याने विद्यार्थ्यांची अडचण दुर होणार आहे.
सेलू येथून वर्धेला शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यापैकी १६० ते १८० विद्यार्थी आरती चौकातून शाळेचा मार्ग पकडतात; पण शाळा सुरू झाल्यापासून या चौकात बस थांबत नव्हती. मुख्य डाकघराजवळ थांबा दिल्याने विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत. विद्यार्थ्यांना होणारा त्रास पाहता १८० जणांच्या स्वाक्षरीनिशीचे निवेदन शिष्टमंडळाने वर्धा आगार प्रमुखांना दिले. यावेळीच्या चर्चेत आरती चौकात बस थांबविण्यास कोणतीही हरकत नसून वाहतूक पोलीस बसगाड्यांना चालान करीत असल्याने थांबा बंद केल्याचे सांगितले. यावर शिष्टमंडळाने वाहतूक पोलीस निरीक्षकांची भेट घेवून विद्यार्थ्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल अवगत केले. वाहतूक पोलीस निरीक्षकांनी आगार प्रमुखासोबत भ्रमणध्वनीवरुन संपर्क केला. आरती चौकात बसेस थांबवाव्या असे सांगून शिष्टमंडळास सहकार्य केले. यावेळी अभय वैरागडे, विजय माहुरे, दिलीप भजभुजे, भारत शंकदरबार, ज्ञानेश्वर माळोदे, नितिन हिवंज, अनिल वझे, पोहाणे, व्यापारी, साखरकर, निकम, शिंदे आदी उपस्थित होते.