पुलाचे बांधकाम रखडल्याने बससेवा झाली बंद
By Admin | Updated: November 14, 2016 00:56 IST2016-11-14T00:56:58+5:302016-11-14T00:56:58+5:30
विजयगोपाल ते तांभा या मार्गावरील सावंगी (येंडे) येथील पुलाचे बांधकाम दोन वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आले.

पुलाचे बांधकाम रखडल्याने बससेवा झाली बंद
बांधकाम पूर्ण करण्याची मागणी : विजयगोपाल ते तांभा मार्गावरील प्रवाशांना फटका
विजयगोपाल : विजयगोपाल ते तांभा या मार्गावरील सावंगी (येंडे) येथील पुलाचे बांधकाम दोन वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आले. या पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन झाले; पण दोन वर्षांचा कालावधी लोटूनही पुलाचे बांधकाम पूर्ण झाले नाही. यामुळे या मार्गावरील बसफेरी बंद झाली आहे. याचा फटका येथील प्रवाशांना बसत असल्याचे दिसते.
निधीच्या अडचणीमध्ये या पुलाचे बांधकाम रखडल्याचे सांगण्यात येत आहे. विजयगोपाल ते तांभा, सावंगी (येंडे) रस्त्यावर असलेला गाव नाल्यावरील पूल अतिशय जीर्ण झाला होता. तसेच हा पूल कमी उंचीचा असल्याने अल्पशा पावसानेही पुलावरील वाहतूक बंद होत होती. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी येथे नवीन पूल देण्याची मागणी तत्कालीन बांधकाम राज्यमंत्री रणजीत कांबळे यांच्याकडे केली. या मागणीला मंजुरी देत त्यांनी या पुलाच्या बांधकामाकरिता निधी उपलब्ध करून दिला. यानंतर पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. बांधकामालाही प्रारंभ झाला; पण मध्येच हे काम रखडले.
पुलाच्या बांधकामाची गती अतिशय मंद असल्याने दोन पावसाळे लोटले तरी काम अद्यापपर्यंत पूर्ण झाले नाही. या पुलाचे बांधकाम अर्धवट स्थितीत आहे. यामुळे या मार्गावरील बसफेरी वर्षभरापासून बंद आहे. याचा फटका विद्यार्थी आणि ग्रामस्थांना बसत आहे. त्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो.
या पुलाचे बांधकाम पूर्ण करण्याचा कालावधी लोटला तरी याचे काम अपूर्ण आहे. पुलाचे बांधकाम अद्यापपर्यंत अर्धवट का, असा प्रश्न परिसरातील नागरिक उपस्थित करीत आहे. पुलाचे बांधकाम अर्धवट तर आहेच, शिवाय बांधकाम साहित्य रस्त्यात टाकले जात असल्याने वाहनांना अपघात होत असल्याचे दिसून येत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. पुलाचे बांधकाम झाले नसल्याने बसफेरी बंद केली आहे. यामुळे परिसरातील प्रवाशांची पायपीट होते. बांधकाम विभागाकडून या पुलाचे बांधकाम कधी सुरू होईल याकडे परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.(वार्ताहर)