अर्ध्यावरच लागतो बसला ब्रेक
By Admin | Updated: April 23, 2015 01:54 IST2015-04-23T01:54:17+5:302015-04-23T01:54:17+5:30
प्रत्येक रविवारी समुद्रपूर येथून वर्धेला येण्याकरिता सेवाग्राम मार्गे बसफेऱ्या कमी असतात़ दोन ते तीन तास प्रवाश्यांना बसची प्रतीक्षा करावी लागते़ ...

अर्ध्यावरच लागतो बसला ब्रेक
वर्धा : प्रत्येक रविवारी समुद्रपूर येथून वर्धेला येण्याकरिता सेवाग्राम मार्गे बसफेऱ्या कमी असतात़ दोन ते तीन तास प्रवाश्यांना बसची प्रतीक्षा करावी लागते़ शिवाय बहुतांश बसेस नादुरूस्त असल्याने त्या मधेच फेल पडतात़ यामुळे प्रवाश्यांना दुसऱ्या वाहनांनी गंतव्य स्थळ गाठावे लागते़ परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कारवाई करणे गरजेचे झाले आहे़
समुद्रपूर ते वर्धा दरम्यानचा प्रवास प्रवाश्यांकरिता डोकेदुखी ठरत आहे़ रविवारी बसफेऱ्या कमी होतात तर नादुरूस्त बसेसचा फटका प्रवाश्यांना सहन करावा लागतो़ याबाबत वर्धा बसस्थानकावर असलेल्या चौकशी कक्षात विचारणा केल्यास समुद्रपूर ये-जा करण्याकरिता प्रत्येक पाच मिनिटांनी बसफेरी असल्याचे सांगितले जाते़ काही बसेस फेल आहेत वा काही फेऱ्या कमी करण्यात आल्याचेही सांगितले जाते़ वर्धा ते समुद्रपूर मार्गावर बरेच थांबे आहेत. यामुळे वाहकांनी स्वत:च्या जागेवर बसूनच तिकीटे देणे गरजेचे आहे; पण तसे होत नाही़ थांबा जवळ येत असताना वाहक तिकीटे देण्यात व्यस्त असतात़ दरम्यान प्रवासी घेणे वा उतरविताना त्यांच्या जीवितास धोका होण्याची शक्यता असते़
वर्धा ते समुद्रपूर मार्गावरील बसेस नेहमी मधेच फेल होतात़ हा प्रकार प्रवाश्यांना त्रास देणाराच ठरत आहे़ वाहक व चालकांनी बस सुस्थितीत आहे काय, हे तपासूनच बस समोरच्या प्रवासाकरिता काढणे गरजेचे आहे; पण वाहक व चालक त्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात़ परिणामी, प्रवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो़ काही बसचालक स्वत:च्या मर्जीनुसार समुद्रपूरपर्यंत जाणारी बस असताना जाम बसस्थानकावरून वर्धेकडे वळवितात़ बसचा प्रवास सुरक्षित प्रवास, हात दाखवा बस थांबवा, हे परिवहन महामंडळाचे ब्रिद वाचण्यापुरतेच मर्यादित झाल्याचे दिसते़ समुद्रपूर बसस्थानकावरून दुपारच्या वेळी बसेस नसतात, याचा अनुभव प्रवाश्यांनी फेबु्रवारी, मार्च आणि एप्रिल महिन्यात घेतला़ दुपारी १२ ते १.३० वाजेपर्यंत, बसेस उपलब्ध राहत नसून थेट साडेतीन वाजता बस उपलब्ध होते़ याबाबत वर्धा चौकशी विभागास विचारणा केल्यास कर्मचाऱ्यांद्वारे बेजबाबदार उत्तरे दिली जातात़ या प्रकारामुळे या मार्गावरील प्रवासी त्रस्त झाले आहेत़
प्रवाश्यांच्या सोयीकरिता सेवाग्राम मार्गे समुद्रपूरपर्यंत बसफेऱ्या वाढविणे गरजेचे झाले आहे़ शिवाय त्या बसफेऱ्या वेळेवर असणेही गरजेचे आहे़ परिवहन महामंडळाने प्रवाश्यांचे समाधान केल्यास एसटीचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे़ यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत प्रवाशांना न्याय मिळवून द्यावा, प्रवाशांचे प्रश्न समजून घेऊन त्वरित कारवाई करावी, अशी मागणी बापू युवा संघटनचे सुरेश पट्टेवार यांनी केली आहे़ याबाबत त्यांनी विभाग नियंत्रक गव्हाळे यांना निवेदनही सादर केले आहे़(कार्यालय प्रतिनिधी)