नागपूर मार्गावर ‘दि बर्निंग ट्रक’; चालक जखमी
By Admin | Updated: March 4, 2017 00:37 IST2017-03-04T00:37:53+5:302017-03-04T00:37:53+5:30
वर्धा-नागपूर महामार्गावर केळझर नजीक ट्रकने पेट घेतल्याने ट्रकचालक जखमी झाला.

नागपूर मार्गावर ‘दि बर्निंग ट्रक’; चालक जखमी
केळझर : वर्धा-नागपूर महामार्गावर केळझर नजीक ट्रकने पेट घेतल्याने ट्रकचालक जखमी झाला. यात ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सदर घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, नागपूर येथून कोंबड्यांचा चारा घेवून जाणाऱ्या सीजी ०४ जेए १२९२ क्रमांकाच्या ट्रकने अचानक पेट घेतला. यात ट्रक चालक दिलीप उत्तम टेंभेकर रा. प्लॉट नं. १७ विश्वास नगर, वर्धा रोड नागपूर जखमी झाला. त्याला उपचारार्थ सेवाग्राम येथे दाखल करण्यात आले आहे. तर ट्रकच्या कॅबीनसह दर्शनी भाग पूर्णपणे जळाल्याने मोठे नुकसान झाले. सेलू पोलिसांनी वर्धेवरून अग्नीशामक दलाला पाचारण केले. अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाल्यानंतरही आगीवर ताबा मिळविण्याकरिता तब्बल चार तासाचा कालावधी लागला. सेलू पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.(वार्ताहर)