साडेतीन एकरातील ऊस जळाला

By Admin | Updated: December 13, 2015 02:07 IST2015-12-13T02:07:39+5:302015-12-13T02:07:39+5:30

सुरगाव मार्गावरील आचार्य विनोबा भावे आश्रम मागील पवनार शिवारात राधाबाई घुगरे यांचे शेत आहे.

Burn three to three acres of sugarcane | साडेतीन एकरातील ऊस जळाला

साडेतीन एकरातील ऊस जळाला

मदतीची आशा धुसर : शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा आरोप
पवनार : सुरगाव मार्गावरील आचार्य विनोबा भावे आश्रम मागील पवनार शिवारात राधाबाई घुगरे यांचे शेत आहे. त्यांच्या शेतात असलेल्या साडेतीन एकरातील ऊस जळाला. यात सदर शेतकऱ्याचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही आग शॉट सर्किटमुळे लागल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे. सदर घटना शनिवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास निदर्शनास आली.
या शेतातील ऊसाला आग लागल्याचे सर्वप्रथम पहाटे ब्रह्मविद्या मंदिरचे गौतम बजाज यांच्या निर्दशनास आले. त्यांनी याची माहिती लगेच सरपंच अजय गांडोळे यांना भ्रमणध्वनीवरून दिली. गांडोळे यांनी ताबडतोब शेतकऱ्याला माहिती देत घटनास्थळावर पाठविले. सोबतच सेवाग्राम पोलिसांनाही त्याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता ऊसाकडे जाण्यास त्यांच्यातही भीती निर्माण झाली होती; परंतु ओलितामुळे आजूबाजूच्या शेतातील जमिनी ओल्या असल्यामुळे आग इतर शेतापर्यंत पोहोचली नाही. यात शेतातील साडेतीन एकरातील संपूर्ण ऊस जळाला.
ही आग शॉट सर्किटमुळे लागल्याची तक्रार येथील महावितरणच्या कार्यालयात करण्यात आली. यावरून अभियंता सुनील कोरे यांनी शेतात जाऊन पंचनामा केला. सेवाग्राम पोलीस ठाण्याचे पांडे यांनीसुद्धा पंचनामा केला. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तयार केलेला अहवाला कार्यालयात सादर केल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल अथवा नाही, हे सांगणे कठीण असल्याचे अभियंता कोरे म्हणाले. (वार्ताहर)

प्राथमिक तपासणीमध्ये शॉट सर्किटमुळे आग लागल्याचे निदर्शनात येत नाही; परंतु खोलवर तपासणी केल्यानंतर आग लागण्याचे कारण कळेल. मदत मिळेल अथवा नाही हे आताच निश्चित सांगता येणार नाही.
- सुनील कोरे, कनिष्ठ अभियंता, वीज वितरण, पवनार

शेतकऱ्याचे जास्त नुकसान होऊ नये म्हणून जळालेला ऊस ताबडतोब कापण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. शेतकऱ्याला वीज वितरणकडून नुकसान भरपाई मिळण्याकरिता कारखाना सर्वोतोपरी मदत करेल.
- राजन साल्पेकर, उपमहाव्यवस्थापक महात्मा शुगर अ‍ॅण्ड पॉवर, जामणी

सहा एकर शेतीपैकी साडेतीन एकरात ऊसाची लागवड होती. सोयाबीनने दगा दिल्यानंतर ऊसाचाच आधार होता. तो ही जळाल्यामुळे आता बँकांचे कर्ज व उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
- रामू घुगरे, पीडित शेतकऱ्याचा मुलगा, पवनार.

Web Title: Burn three to three acres of sugarcane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.