कार जळून भस्मसात
By Admin | Updated: November 5, 2016 00:57 IST2016-11-05T00:57:55+5:302016-11-05T00:57:55+5:30
दिवाळीच्या फराळासाठी गावात आलेला जावई कार शेतशिवारात फेरफटका मारण्यासाठी गेला असता या गाडीने अचानक पेट घेतला.

कार जळून भस्मसात
मुरदगाव (खोसे) येथील घटना
देवळी : दिवाळीच्या फराळासाठी गावात आलेला जावई कार शेतशिवारात फेरफटका मारण्यासाठी गेला असता या गाडीने अचानक पेट घेतला. पाहता पाहता ही गाडी भस्मसात झाली. शुक्रवारी सकाळी मुरदगाव (खोसे) येथे ही घटना घडली.
नांदोरा डफरे येथील बोटफोले यांच्याकडे त्यांचे जावई व कुटुंबीय दिवाळीनिमित्त आले होते. जावईबापू वरोरा येथे नोकरीवर असल्याने ते स्वत: नॅनोगाडीने कुटुंबियासोबत आले. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी सासरच्या मित्रमंडळीपैकी मुरदगाव (खोसे) येथील नवघरे यांच्याकडे ते दिवाळीच्या फराळासाठी गेले. फराळाचा कार्यक्रम सुरू असताना त्यांची टाटा नॅनो गाडी नवघरे कुटुंबियापैकी एकाने फेरफटका मारण्यासाठी शेतात नेली. गावापासून एक कि़मी. अंतरापर्यंत गाडी गेली असता या गाडीने एकाएक पेट घेतला. काही कळण्यापूर्वीच गाडीचा कोळसा झाला.
काही वेळातच ही बातमी फराळ करीत असलेल्या जावयापर्यंत पोहचली. शब्दांचा भडीमार झाला. पोलिसांपर्यंत प्रकरण जावू न देण्याची तंबी देण्यात आली. या सर्व घडामोडीत जावयाला सासरचे पाहुणपण महागात पडले, अशी चर्चा गावात जोरात होती.(प्रतिनिधी)