लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनेंतर्गत कामगारांना तीन दिवसांपासून विविध साहित्य व लोखंडी पेटी वाटप केली जात आहे; पण रविवारी कुठलीही पूर्वसूचना न देता हे साहित्य वाटप बंद ठेवण्यात आले. त्यामुळे संतप्त कामगारांनी एकत्र येत थेट नागपूर-हैद्राबाद महामार्ग रोखल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली होती. कामगारांच्या या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळाकरिता ठप्प झाली होती. सुमारे एक तासाच्या शर्तीच्या प्रयत्नाअंती या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश आले.येथील कलोडे सभागृहात विशेष शिबिराच्या माध्यमातून गुरुवारपासून कामगारांना साहित्याचे किट वाटप केले जात आहे. आपल्यालाही शासकीय योजनेचा लाभ मिळावा या हेतूने रविवारी पहाटे ४ वाजतापासूनच अनेक कामगारांनी कलोडे सभागृह परिसरात पोहोचण्यास सुरुवात केली तर हिंगणघाट तालुक्यातील काही कामगार मध्यरात्रीच येथे पोहोचले होते. रविवारी सूर्य डोक्यावर आल्यावर या ठिकाणाहून साहित्य वाटप बंद असल्याचे कळताच कामगारांचा पारा चढला. त्यानंतर कामगारांनी संविधान चौकात एकत्र येत नागपूर-हैद्राबाद मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. माहिती मिळताच हिंगणघाट पोलिसांनी आंदोलनस्थळ गाठून आंदोलनकर्त्यांना समज दिली. दरम्यान दोन्ही बाजूची वाहतूक विस्कळीत झाली होती. खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.
कर्मचाऱ्यांची बिघडली प्रकृती- गुनीला कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई आणि इंडो अलाईट प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई यांच्यामार्फत वर्धा जिल्ह्यातील ४० हजार लाभार्थ्यांना सुरक्षा पेटीचे वाटप करण्यात येणार आहे. १ मार्चपासून आतापर्यंत १२ हजार ८१ लाभार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले आहे. तर ३१ मार्चपर्यंत साहित्य वाटपाचे उद्दिष्ट आहे. - दोन कर्मचाऱ्यांची प्रकृती बिघडल्याने हिंगणघाटच्या केंद्रातून साहित्य वाटपाचे काम बंद करण्यात आले आहे; पण सेलू आणि येळाकेळी येथे साहित्य वाटप केले जात आहे. - अफवेवर कामगारांनी विश्वास ठेवू नये, असे व्यवस्थापक देव दमाहे यांनी आवाहन केले.