ग्रामीण भागातही पोहोचली बिल्डर लॉबी
By Admin | Updated: July 31, 2015 02:19 IST2015-07-31T02:19:34+5:302015-07-31T02:19:34+5:30
वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत प्रत्येक शहर झपाट्याने विस्तारत आहे. विस्तारीकरणाचे हे लोण आता ग्रामीण भागातही पोहोचले आहे.

ग्रामीण भागातही पोहोचली बिल्डर लॉबी
जमिनीचे भाव वधारले : गावखाऱ्या होताहेत नष्ट
तळेगाव (श्या.पं.) : वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत प्रत्येक शहर झपाट्याने विस्तारत आहे. विस्तारीकरणाचे हे लोण आता ग्रामीण भागातही पोहोचले आहे. यामुळे गावखेड्यांना लागून असलेल्या शेतांचा गावखारी हा प्रकार नष्ट होत आहे. शिवाय जमिनींचे भावही वधारल्याचे दिसते.
वाढती लोकसंख्या सामावून घेणे शहरांना अशक्य होत आहे. यामुळे शहरे प्रचंड फुगत चालली आहे. पालिका, महापालिका हद्दीतील भू-भाग अपूरा पडू लागला आहे. यामुळे शहरालगतच्या ग्रामपंचायतींनाही शहरांनी कवेत घेतल्याचे दृश्य आहे. विस्तारीकरणामध्ये येत असलेल्या ग्रा.पं. च्या हद्दीतील अनेक शेतजमिनीवर गत काही वर्षांत मोठ-मोठ्या वसाहती उभ्या राहिल्या आहेत. येथील रहिवासी शहरात नोकरी करून लगतच्या ग्रामपंचायतीमध्ये वास्तव्य करीत असल्याचे चित्र आहे; पण केवळ शहरालगतच्या ग्रामपंचायतीच नव्हे तर शहरापासून दूरच्या खेड्यांमध्येही ले-आऊट पाडण्याचे प्रकार आता फोफावत आहेत. आष्टी तालुक्यात येणाऱ्या काही गावांत गत काही वर्षांत गावालगतच्या शेतात ले-आऊट पाडून वसाहती थाटल्याचा प्रकार दिसून येतो. हेच लोण आता शेजारी असलेल्या अनेक गावांतही घडत असल्याचे दिसते. अवघ्या काही किमी अंतरावर तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे राहून तालुक्याच्या ठिकाणी नोकरी करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. तालुक्यातील काही गावांमध्येही हा प्रकार आहे; पण खेड्यातील ले-आऊट म्हणून येथे जमिनीचे भाव कमी आहेत, असे नाही. येथेही तालुका पातळीवरचे भाव आकारले जातात. शहरी गर्दीपेक्षा येथे निवांत राहता येईल, या अपेक्षेने खेड्यातील ले-आऊटमध्ये घरासाठी जागा घेणारे तयार झाल्याचे दिसते. अनेकांनी गुंतवणूक म्हणून जागा घेऊन ठेवल्याचे चित्र आहे; पण यात अवैध ले-आऊटची भीतीही व्यक्त होत आहे. यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.(वार्ताहर)