वर्धा जिल्ह्याचा आदर्श निर्माण करा
By Admin | Updated: October 3, 2015 01:53 IST2015-10-03T01:53:21+5:302015-10-03T01:53:21+5:30
शासनाच्या महत्त्वाकांक्षी अशा जलयुक्त शिवार अभियान योजनेंतर्गत जिल्ह्यात उत्तम कार्य झालेले आहे; ...

वर्धा जिल्ह्याचा आदर्श निर्माण करा
सुधीर मुनगंटीवार : शाश्वत शेती, पिण्याच्या पाण्याचे नियोजन करा
वर्धा : शासनाच्या महत्त्वाकांक्षी अशा जलयुक्त शिवार अभियान योजनेंतर्गत जिल्ह्यात उत्तम कार्य झालेले आहे; परंतु ते अतिउत्तम करण्याचा ध्यास सर्वांनी घ्यावा. तसेच मन लावून कार्य करावे व देशात वर्धा जिल्ह्याचा आदर्श निर्माण करावा, असे आवाहन वित्त व नियोजन, वने तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
वर्धा जिल्हा प्रशासन आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या जलयुक्त वर्धा या पुस्तिकेचे विमोचन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत असलेली सर्व कामे अतिउत्तमरीत्या करणे आवश्यक आहे. पूर्वी मोठमोठी धरणे बांधली जायची. परंतु आता अभियानांतर्गत लहान कामांनाही प्राधान्य देऊन शाश्वत पाण्यासाठी अभियान वरदान ठरत आहे. अभियानाचे महत्त्व आणि उपयुक्तता लक्षात घेऊन लोकसहभागातून जलपरिषदेचे आयोजनही करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्याने चांगले काम केले आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या जबाबदारीत आणखी वाढ होऊन अतिउत्तम कामाचा ध्यास जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सिद्धीविनायक, शिर्डी संस्थानने जलयुक्त शिवार अभियानासाठी देऊ केलेला निधी जिल्ह्याला काही प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच जिल्ह्यात एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होणार नाही, यासाठी सर्व यंत्रणांनी पुढाकार घ्यावा, अशा सुचनाही त्यांनी यावेळी केल्या. आ.डॉ. पंकज भोयर यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना वन्यजीव सप्ताहानिमित्त वन्यजीव पेटिंग भेट दिले. वन विभागातील कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री यांच्या हस्ते सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी केले.(स्थानिक प्रतिनिधी)
लोकसहभागातून जलपरिषद आयोजित करणार
जिल्ह्यात एकही शेतकरी आत्महत्या होणार नाही याची खबरदारी घ्या, जलयुक्त अभियानांतर्गत लहान कामांनाही प्राधान्य द्या. शाश्वत पाण्यासाठी अभियान वरदान ठरत आहे. या अभियानाचे महत्त्व व उपयुक्तता लक्षात घेऊन लोकसहभागातून जलपरिषदेचे आयोजनही करण्यात येणार असल्याचे ना. मुनगंटीवार यांनी सांगितले. जिल्हाधिकारी सलिल यांनी जलयुक्त शिवार अभियानाचा सद्यस्थितीचा आढावा यावेळी सादर केला.