नियोजित दिवशीच केंद्रावर कापूस आणावा
By Admin | Updated: January 28, 2015 23:39 IST2015-01-28T23:39:03+5:302015-01-28T23:39:03+5:30
भारतीय कापूस निगम लिमिटेड (सीसीआय) तर्फे आधारभूत किमतीने जिल्ह्यातील आठ केंद्रावर कापसाची खरेदी करण्यात येत असून शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी कापूस खरेदीचे दिवस निश्चित करण्यात आले आहेत.

नियोजित दिवशीच केंद्रावर कापूस आणावा
वर्धा : भारतीय कापूस निगम लिमिटेड (सीसीआय) तर्फे आधारभूत किमतीने जिल्ह्यातील आठ केंद्रावर कापसाची खरेदी करण्यात येत असून शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी कापूस खरेदीचे दिवस निश्चित करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी निश्चित केलेल्या दिवशीच केंद्रावर कापूस खरेदीसाठी आणावा, अशी माहिती जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांनी केले आहे.
कापूस खरेदी केंद्राच्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या साधनसामग्री नुसार त्या त्या केंद्रावर किती जास्त कापूस खरेदी होईल यासंदर्भात मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. तसेच खरेदीचे दिवस निश्चित करण्यात आलेले आहेत. शेतकरी बांधवांनी कापूस केंद्रात माल विक्री आणण्यापूर्वी केंद्रावरील निश्चित केलेल्या दिवशीच कापूस खरेदीसाठी आणावा अस सीसीआयतर्फे सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यात हिंगणघाट केंद्रावर १० हजार क्विंटल दररोज कापूस खरेदी करण्यात येणार असून सोमवार, मंगळवार, गुरूवार व शुक्रवार याच दिवशी कापूस खरेदी करण्यात येईल. वर्धा केंद्रावर दीड हजार क्विंटल दररोज कापूस खरेदीची क्षमता असून सोमवार, मंगळवार, बुधवार या दिवशीच कापूस खरेदी करण्यात येईल. तसेच देवळी केंद्रावर दररोज ३ हजार ५०० क्विंटल सोमवार, मंगळवार, बुधवार रोजी कापूस खरेदी करण्यात येईल. पुलगाव केंद्रावर दररोज १ हजार ५०० क्विंटल सोमवार, मंगळवार, बुधवार रोजी कापूस खरेदी करण्यात येईल. कांढळी केंद्रावर दररोज १ हजार ५०० क्विंटल सोमवार, मंगळवार, बुधवार रोजी कापूस खरेदी करण्यात येईल. सिंदी (रेल्वे) केंद्रावर दररोज १ हजार क्विंटल दररोज गुरूवार, शुक्रवार, शनिवार रोजी कापूस खरेदी करण्यात येईल. रोहणा केंद्रावर दररोज १ हजार ५०० क्विंटल दररोज सोमवार, मंगळवार, बुधवार रोजी कापूस खरेदी करण्यात येईल. वडनेर केंद्रावर १ हजार ५०० क्विंटल दररोज कापूस सोमवार, बुधवार, आणि शनिवार रोजी खरेदी करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.(शहर प्रतिनिधी)