यशोदा नदीवरील पूल खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 06:00 AM2019-09-07T06:00:00+5:302019-09-07T06:00:06+5:30

गुरूवारी सायंकाळी एकाएक नदीच्या पुलाची एक बाजू खचली. ही घटना नांदोराकडून देवळीकडे जाणाऱ्या एका नागरिकाच्या लक्षात आली. त्याने घटनेची माहिती इतरांना दिल्यानंतर पोलिसानाही माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मार्ग वाहतुकीसाठी बंद असल्याचा फलक लावला.

The bridge over the Yashoda River collapsed | यशोदा नदीवरील पूल खचला

यशोदा नदीवरील पूल खचला

Next
ठळक मुद्देदेवळी-नांदोरा मार्ग बंद : पोलिसांनी धोका टाळण्यासाठी लावले कठडे

लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : सततच्या पावसामुळे यशोदा नदीवरील पूल खचला. त्यामुळे देवळी-नांदोरा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. गुरूवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीस येताच सतर्कतेचा एक भाग म्हणून देवळी पोलिसांनी या मार्गाच्या दोन्ही बाजूंनी लोखंडी कठडे लावून मार्ग वाहतुकीसाठी बंद असल्याचा सूचना फलक लावला आहे.
गुरूवारी सायंकाळी एकाएक नदीच्या पुलाची एक बाजू खचली. ही घटना नांदोराकडून देवळीकडे जाणाऱ्या एका नागरिकाच्या लक्षात आली. त्याने घटनेची माहिती इतरांना दिल्यानंतर पोलिसानाही माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मार्ग वाहतुकीसाठी बंद असल्याचा फलक लावला. हा पूल अनेक वर्षांपासून दुर्लक्षीत असून नादुरूस्त आहे. पुलाच्या कडाही तुटल्या आहेत. शिवाय पुलावर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहे.
सदर बाब बांधकाम विभागाच्या लक्षात आणून दिल्यावरही त्याकडे दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानली जात आहे. प्रशासनाचे नियोजन नसल्याने पुलाचे जुने बांधकाम दुर्लक्षित ठरले आहे. तालुक्यातील इतर ठिकाणी सुद्धा काही प्रमाणात अशीच परिस्थिती आहे. डिगडोह नदीवरील पुलाचे एक बाजू पूर्णत: खरडून गेली आहे. त्यामुळे या पुलावरील वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे.
नाल्यावरील रपट्याला काही ठिकाणी भेगा पडल्या आहे. त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेऊन वेळीच उपाययोजना करावी, अशी मागणी आहे.

बोरी मार्गावरील पूल खचला
बोरधरण - बोरी येथील गावाजवळील पूल पुरामुळे खचला. अर्धाअधिक पूल खचल्याने या मार्गाने चार चाकी वाहन जाणे कठीण झाले आहे. शिवाय दुचाकी चालकांना जीव मुठीत घेऊनच पूल पार करावा लागत आहे. या मार्गावरील प्रवास एखाद्याच्या जीवावर बेतल्यावर दुरूस्तीचे काम हाती घेणार काय, असा प्रश्न या भागातील नागरिकांकडून विचारला जात आहे.

चार दिवसांपासून पुलावरील पाणी कमी होईना
आंजी (मोठी) - येथून ४ किमी अंतरावर असलेल्या खैरी येथील ग्रामस्थांच्या अडचणीत सध्या चांगलीच भर पडली आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याने मागील चार दिवसांपासून या गावाचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे. विशेष म्हणजे कुठलेही साहित्य खरेदी करण्यासाठी या गावातील नागरिकांना आंजी (मोठी) येथे यावे लागते.
सेलू तालुक्याच्या शेवटच्या टोकावर ६०० लोकसंख्या असणारे खैरी हे गाव आहे. या गावाचा प्रत्येक कामासाठी आंजी (मोठी) या गावाशी संपर्क पडतो. वर्धा-आर्वी मार्गावरून या गावात जाण्यासाठी जोड रस्त्यावर धाम नदी वरून पूल आहे. परंतु, तो छोटा असल्याने आणि त्याची उंचीही कमी असल्याने पावसाळ्यात या गावातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो.
मागील चार दिवसांपासून याच पुलावरून सतत पुराचे पाणी वाहत आहे. शिवाय वाहणाºया पाण्याला चांगलाच प्रवाह असल्याने या पुलावरून ये-जा करणे कठीण झाले आहे. काही जण जीव मुठीत घेऊन हा पूल ओलांडण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे हा प्रकार एखाद्या अनुचित घटनेला निमंत्रण देणारा ठरत आहे. पुलाची उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी गत २० वर्षांपासून होत असून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. दहा वर्षांपूर्वी या गावातील नागरिकांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता, हे विशेष.

Web Title: The bridge over the Yashoda River collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.