आश्रमकडे जाणारा पूल ढासळतोय
By Admin | Updated: April 25, 2015 00:07 IST2015-04-25T00:07:50+5:302015-04-25T00:07:50+5:30
जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रासह संपूर्ण देशात आणि जगातही सर्वपरिचित असलेला आचार्य विनोबा भावे यांचा पवनार येथील आश्रम आपली खास ओळख ठेवून आहे.

आश्रमकडे जाणारा पूल ढासळतोय
दुरूस्तीची मागणी : अपघात होण्याची शक्यता
वर्धा : जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रासह संपूर्ण देशात आणि जगातही सर्वपरिचित असलेला आचार्य विनोबा भावे यांचा पवनार येथील आश्रम आपली खास ओळख ठेवून आहे. केवळ आश्रमच नव्हे तर आश्रमसमोरील धाम नदीचे पात्र पर्यटकांना भुरळ घालते. त्यामुळे दरवर्षी हजारो पर्यटक येथे भेटी देतात. परंतु आश्रमकडे जाण्यासाठी सोपा असलेल्या मार्गावरील पूल ढासळू लागला आहे. पुलावरील कठडेही गायब आहे. ‘क’ दर्जाचे पर्यटन असतानाही अशी स्थिती असल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.
पवनार येथील विनोबा आश्रमात दरवर्षी हजारो पर्यटक भेटी देत असतात. धाम नदीच्या काठावर वसलेले आश्रम विहंगम दृश्यामुळे सर्वाचा भुरळ घालत असते. खडकाळ पात्रातून बारमाही पाण्याचा प्रवाह सुरू असतो. महात्मा गांधी आणि विनोबा या दोघांच्या स्मृती येथे उभारण्यात आल्या आहे. पवनार हे यवतमाळ-नागपूर मार्गावरील महत्त्वाचे गाव आहे. या मार्गावरून नागपूरला जाण्यासाठी पवनार वरूनच जावे लागते.
या कारणाने लहान पुलावरून होत असलेला वाहतुकीचा खोळंबा कमी करण्यासाठी काही वर्षांपूर्वी येथील नदीवर मोठा पूल बांधण्यात आला. त्यामुळे वाहतूक सोयीची झाली असली तरी आश्रमकडे जाण्यासाठी लहान पूल सोयीचा असल्याने त्या पुलाचा उपयोग पर्यटकांद्वारे आवर्जून केला जात आहे. परंतु अनेक वर्ष धाम नदीचे पूर सोसत या पुलाची अनेक ठिकाणी दुरवस्था झाली आहे.
आजही पूल भक्कम उभा असला तरी दुर्लक्षितपणामुळे काही ठिकाणी तो क्षतीग्रस्त झाला आहे. रात्रीला यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. पर्यटकांची गौरसोय लक्षात घेता या पुलाची चांगली दुरुस्ती करावी अशी मागणी पर्यटक करीत आहे. परंतु पुलासह रस्त्याचीही दुरवस्था झाल्याने ये जा करीत असलेलेनागरिक संताप व्यक्त करीत असतात. असे असतानाही प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते.(शहर प्रतिनिधी)
पर्यटन निधीतून विकासाची अपेक्षा
पवनारला पर्यटनस्थळाचा क दर्जा मिळाला आहे. तसेच मिळत असलेल्या आर्थिक मदतीत वाढ झाल्याचेही बोलल्या जात आहे. यातून आश्रम परिसर तसेच नंदीखेडा परिसराचे सौंदर्यीकरण होणार आहे. त्यामुळे याच पैशातून पुलाची दुरुस्ती करण्याची गरज व्यक्त होत आहे. परंतु ही दुरुस्ती या निधीतून केली जाईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कठड्याविना अघाताचा धोका
या पुलावरील कठडे कित्येक वर्षांपासून गायब आहेत. मोठ पूल झाल्यामुळे लहान पुलावरून वाहतूक कमी झाली. परंतु पर्यटकांना आश्रमात जाण्यासाठी आजही लहान पूल सोयीचा आहे. त्यामुळे ते याच पुलावरून जाण्यास प्राधान्य देतात. अनेक दिवसांपासून पुलाचा काही भाग खचला आहे. तसेच कठडेही नाहीत अनेकांच्या मागणीनंतर केवळ त्यावर वरवार प्लास्टर करण्यात आले. परंतु कठडे मात्र बसविण्यात येत नसल्याने आपघाताची शक्यता आहे.
पालकमंत्र्यांच्या आदेशाकडेही संबंधितांचे दुर्लक्ष
पुलाबरोबरच आश्रमाकडे जात असलेल्या रस्त्याचीही दैना झाली आहे. काही महिन्यांंपूर्वी धाम नदीच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात आली होती. यासाठी जिल्ह्यातील अधिकारी वर्गासोबतच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हजर होते.
यावेळी आश्रमचे गुतम बजाज यांनी रस्त्याच्या दुरवस्थेविषयी त्यांना अवगत केले. तेव्हा पालकमंत्र्यांनी लवकरच रस्त्याची दुरुस्ती होईल, असे आश्वासन दिले होते. परंतु दोन महिने लोटूनही याबाबत अद्यापही हालचाली झाल्याचे दिसत आहे. हा रस्ता लवकर दुरुस्ती करावा, अशी नागरिकांसह पर्यटकांची मागणी आहे.