लाचखोर पटवारी एसीबीच्या जाळ्यात
By Admin | Updated: July 1, 2014 23:37 IST2014-07-01T23:37:24+5:302014-07-01T23:37:24+5:30
कृषी पंपाला वीज जोडणी मिळण्याकरिता सातबारावर विहिरीची नोंद करण्याकरिता ५०० रुपयांची लाच मागणाऱ्या हिंगणघाट तालुक्यातील बोपापूर येथील पटवाऱ्याला एसीबीने लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.

लाचखोर पटवारी एसीबीच्या जाळ्यात
सातबारावर विहिरीची नोंद करण्याकरिता मागितले ५०० रुपये
वर्धा : कृषी पंपाला वीज जोडणी मिळण्याकरिता सातबारावर विहिरीची नोंद करण्याकरिता ५०० रुपयांची लाच मागणाऱ्या हिंगणघाट तालुक्यातील बोपापूर येथील पटवाऱ्याला एसीबीने लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. ही कारवाई हिंगणघाट पंचायत समितीसमोर असलेल्या एका हॉटेलात मंगळवारी सायंकाळी ४.१५ वाजताच्या सुमारास करण्यात आली. एसीबीच्या जाळ्यात असलेल्या या पटवाऱ्याचे नाव अशोक मधुकर चन्नूरवार असे आहे.
या बाबात थोडक्यात वृत्त असे की, हिंगणघाट तालुक्यातीन हिवरा येथील शेतकरी प्रमोद उगे याच्या वडिलांच्या नावे असलेल्या शेतात विहीर आहे. या विहिरीवर उगे याला कृषी पंप लावण्याकरिता सातबारावर विहिरीची नोंद करावयाची होती. याकरिता तो पटवारी अशोक चन्नूरवार याच्याकडे गेला. यावेळी पटवाऱ्याने त्याला नोंद करण्याकरिता पैसे लागतात, असे म्हटले. यावर शेतकऱ्याने त्याला नकार दिला. या कामाकरिता शेतकरी सतत पटवाऱ्याची संवाद साधत होता. यावर त्रासलेल्या पटवाऱ्याले शेतकरी उगे यांच्या सातबाऱ्यावर विहिरीची नोंद करून दिली.
सातबाऱ्यावर नोंद केल्यानंतर सदर पटवाऱ्याने या शेतकऱ्याला तुझे काम केले, मला ५०० रुपये लागतील, असे म्हटले. यावर शेतकऱ्याने त्याला काही दिवस फिरविले. य पटवाऱ्याला अद्दल शिकवायची असे म्हणत त्याने या प्रकाराची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. या तक्रारीवरून सापळा रचून विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी त्याला पैसे घेताना रंगेहात पकडले. या पटवाऱ्यावर लाचलुप प्रतिबंधक कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला. ही कारवाई एसीबीच्या नागपूर विभागाचे पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक निशिथरंजन मिश्रा यांच्या मार्गदर्शनात वर्धेचे पोलीस निरीक्षक प्रदीप चौगावकर जमादार प्रदीप देशमुख, राजेश बुरबुरे, गिरीश कोरडे, मनिष घोडे, प्रदीप कदम यांनी केली. (प्रतिनिधी)