दुर्गंधीमुळे गुदमरतोय चिमुकल्यांचा श्वास
By Admin | Updated: March 28, 2017 01:07 IST2017-03-28T01:07:30+5:302017-03-28T01:07:30+5:30
शहरात स्वच्छता नांदावी म्हणून पुलगाव नगर पालिका प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.

दुर्गंधीमुळे गुदमरतोय चिमुकल्यांचा श्वास
आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर : शाळा परिसरात घाणीचे साम्राज्य
वर्धा : शहरात स्वच्छता नांदावी म्हणून पुलगाव नगर पालिका प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. असे असले तरी काही भागात ही स्वच्छता मोहीम पोहोचत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी, शाळेतील चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगर परिषदेच्या टीपू सुलतान उर्दु प्राथमिक शाळेचा परिसर दुर्गंधीमध्ये हरविला आहे. पालिकेने याकडे लक्ष देत स्वच्छता राखणे व शैक्षणिक वातावरणाची निर्मिती करणे गरजेचे आहे.
नगर पालिका प्रशासनापासून हाकेच्या अंतरावर पालिकेची टीपू सुलतान उर्दु प्राथमिक शाळा आहे. या शाळेचे प्रांगण सोडले तर अन्यत्र घाणीचे साम्राज्यच दिसून येते. रुग्णालय वसाहतीच्या बाजूला गल्लीमध्ये ही शाळा आहे. रस्त्याच्या कडेला दुकाने असून सदर बोळीचा वापर स्वच्छतागृह म्हणूनच केला जातो. शाळेच्या मागील भागात नागरिक, दुकानदार कचरा आणून टाकतात. शाळेमध्ये गोरगरीब घरातील मुले शिक्षण घेतात. या चिमुकल्यांचे आरोग्यच दुर्गंधीमुळे धोक्यात आले आहे. वराहांचा सुळसुळाट असून शाळेतून बाहेर पडताच घाणीशी सामना होतो. नगर पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
पुलगाव येथे रेल्वेच्या भिंतीलगतही उकिरडे
टीपू सुलतान शाळेच्या मागील भागात पुलगाव रेल्वे स्थानक आहे. या भागातही सांडपाण्याच्या नाल्या वाहत असून त्याची दुर्गंधीही शाळेतील वातावरण दूषित करीत आहे. शाळेच्या मागील भागातही कचरा टाकला जात असून वराहांचा उच्छाद असतो. या प्रकारामुळे चिमुकल्यांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे.
अतिक्रमणातील ठेलेही रस्त्यावर
शाळेत जाण्याकरिता असलेल्या मार्गावर अतिक्रमण हटाव कारवाईमध्ये हटविण्यात आलेले ठेले ठेवण्यात आले आहेत. परिणामी, रस्ता अरूंद झाला आहे. शिवाय याच भागात घाण केली जात असल्याने त्या परिसरात उभे राहणेही शक्य होत नाही. मग, विद्यार्थी शिक्षण कसे घेऊ शकतील, हा प्रश्नच आहे. शिवाय शिक्षक, कर्मचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे.