लोकसंख्या नोंदवहीच्या कामांवर बहिष्कार
By Admin | Updated: October 10, 2015 02:36 IST2015-10-10T02:36:50+5:302015-10-10T02:36:50+5:30
जिल्हा परिषदांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

लोकसंख्या नोंदवहीच्या कामांवर बहिष्कार
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : शिक्षक संघटना एकवटल्या
वर्धा : जिल्हा परिषदांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. शिक्षक कामात हयगय करतात असा आरोप करण्यात येत आहे. वास्तविकतेत मात्र शिक्षकावर अतिरिक्त कामांचा भार लादल्या जात आहे. याकडे साऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. म्हणूनच शिक्षकांवर सोपविलेल्या राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्याच्या कामाला जिल्ह्यातील सर्वच शिक्षक संघटनांकडून विरोध नोंदविण्यात येत आहे. या बहिष्काराकरिता जिल्ह्यातील आठ शिक्षक संघटनांनी एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्यायावत करून त्यात प्रत्येक नागरिकाचा आधार क्रमांक आणि भ्रमणध्वनी क्रमांक नोंदवून डाटाबेस करीता माहिती तयार करावयाची आहे. सोबतच २०११ मध्ये जनगणनेच्या वेळी नोंदविलेल्या यादीतील स्थालंतरीत वा निधन झालेल्या व्यक्तींची नावे वगळे व नवीन आलेल्या किंवा जन्म झालेल्या व्यक्तीची नावे जोडावयाची आहे. या कामासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शिक्षकांना नियुक्त करण्यात आले आहे. प्रत्येक शिक्षकाकडे एक हजारापेक्षा अधिक व्यक्तींची माहिती तयार करण्याचे काम देण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांतील एकापेक्षा अधिक शिक्षकांचे आदेश काढले असून सदर काम एक महिन्यात पूर्ण करायचे आहे. यामुळे शिक्षकांचे अध्यापनाच्या कार्याकडे दुर्लक्ष होणार आहे.