रामकृष्ण हरी...च्या जयघोषाने बोरतीर्थ दुमदुमले

By Admin | Updated: February 10, 2016 02:32 IST2016-02-10T02:32:48+5:302016-02-10T02:32:48+5:30

टाळ मृदुंगांचा निनाद, भगव्या पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन दिंडी पालखी सोहळा थाटात पार पडला.

Borneartha Dumdumle by the euphoria of Ramakrishna Hari ... | रामकृष्ण हरी...च्या जयघोषाने बोरतीर्थ दुमदुमले

रामकृष्ण हरी...च्या जयघोषाने बोरतीर्थ दुमदुमले

फुलला भक्तांचा मळा : संत केजाजी महाराज पुण्यतिथी सोहळा; आज काल्याचे कीर्तन
घोराड : टाळ मृदुंगांचा निनाद, भगव्या पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन दिंडी पालखी सोहळा थाटात पार पडला. वारकऱ्यांच्या गर्दीने व रामकृष्ण हरीच्या जयघोषाने अख्खे बोरतीर्थ दुमदुमून गेले होते.
बोर नदीच्या तीरावर वसलेल्या व प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोराड येथे संत केजाजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त मंगळवारी दिंडी पालखी सोहळा पार पडला. या दिंडीत २५० पेक्षा अधिक भजनी दिंड्या सहभागी झाल्या होत्या. संत केजाजी महाराजांनी रामकृष्ण हरी हा मंत्र दिला. डोळ्याचे पारणे फेडणारा हा सोहळा पाहण्यासाठी २० हजार पेक्षा जास्त भाविक घोराडमध्ये दाखल झाले होते. सकाळपासूनच घोराडकडे येणारे रस्ते भाविकांनी फुलून गेले होते. सकाळी ९ वाजता विठ्ठल रुख्माई मंदिरातून दिंडी पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला. प्रत्येक भाविक या दिंडी सोहळ्यात सहभागी होत होता. बोरतीरावरून निघालेली दिंडीमध्ये हरिनामाचा गजर करीत पुढे जात असताना चंद्रभागेच्या तिरावर असल्याचा भास होत होता. दिंडी सोहळा हा आळंदी ते पंढरपूरची पायदळ वारीची आठवण करून देत असल्याचे भाविक सांगत होते. सायंकाळी ६ वाजेपर्यंत हा पालखी सोहळा सुरू होता. केजाजी महाराजांची पालखी फुलांच्या माळांनी सजविली होती. गावातील रस्ता न रस्ता रंगीबेरंगी रांगोळ्यांनी सजले होते.

दोन किमीचा दिंंडी सोहळा
घोराड : दिंडी चालत असताना फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव होत होता. विणेकऱ्यांचा पाय धवून, कुंकवाचा टिळा लावल्या जात होता. जागोजागी भाविकांचे स्वागत केले जात होते. भाविकांच्या सेवेसाठी घोराड मधील बालकापासून तर वयोवृध्दापर्यंत प्रत्येक नागरिक सेवेत व्यस्त होते. जवळपास दोन कि.मीच्या अंतरात हा दिंडी सोहळा असल्याने ग्रामस्थ व युवा मंडळाच्या मदतीने भाविकांची गैरसोय होवू नये म्हणून जागोजागी चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. विदर्भातून असंख्य भाविक हा सोहळा पाहण्यासाठी आल्याने जणू घोराडमध्ये भक्तांचा मळा फुलला होता.
टाळ मृदुगांच्या ठेक्यावर, हरिनामाचा जप करीत १० तास हा दिंडी सोहळा भक्तीमय वातावरणात भक्तीचा रंग उधळत भाविकांना भक्तीरसाचे अमृतपान देत सायंकाळी ६ वाजता विठ्ठल रुख्मिणी मंदिर परिसरात पोहचली. ग्रामस्थाच्यावतीने दिंडी सोहळ्यानिमित्त आयोजित महाप्रसादाचा २० हजार भाविकांनी लाभ घेतला. या महाप्रसादाकरिता गावातूनच गोळा करण्यात येत असलेल्या लोकसहभागातील निधीचा वापर करण्यात येत आहे.(वार्ताहर)

Web Title: Borneartha Dumdumle by the euphoria of Ramakrishna Hari ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.