बोरगावच्या गिट्टी खदानीत मजूर बुडाला
By Admin | Updated: February 2, 2016 01:50 IST2016-02-02T01:50:15+5:302016-02-02T01:50:15+5:30
बोरगाव (मेघे) परिसरात असलेल्या गिट्टी खदानीत मृतदेह बुडाल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली.

बोरगावच्या गिट्टी खदानीत मजूर बुडाला
पोलीस ठाण्याच्या हद्दीच्या वादात घटना दुर्लक्षित
वर्धा : बोरगाव (मेघे) परिसरात असलेल्या गिट्टी खदानीत मृतदेह बुडाल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. मात्र त्यांच्याकडून बुडालेल्या मजुराचा शोध घेण्यात कुचाराई होत असल्याने त्याचा पत्ता लागला नसल्याचा आरोप त्याच्या परिवारातील सदस्यांसह परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. ही घटना शनिवारी घडली असून पोलिसांकडून सोमवारी खदानीतील पाणी काढण्याचे काम सुरू असून पोलिसांना काहीच गवसले नसल्याचे सांगण्यात आले.
पाण्यात बुडालेल्या मजुराचे नाव आकाश मनोज मेश्राम असे असल्याचे सांगण्यात येत आहे. तो येथील केशव कळंबे यांच्याकडे मजुरीचे काम करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. शनिवारी तो सकाळी नित्याप्रमाणे म्हशी घेवून चारण्याकरिता गेला होता. सायंकाळ झाली तरी त्याचा थांबपत्ता लागला नाही. यामुळे त्याचा शोध घेतला असता खदानीतील पाण्यात म्हशीचा मृतदेह आढळून आला. मात्र त्याचा पत्ता लागला नाही. यामुळे याच पाण्यात तो बुडाला असल्याचा अंदाज सर्वत्र वर्तविल्या जात आहे.
या घटनेची माहिती सावंगी पोलिसांना देण्यात आली. त्यांनी सदर परिसर आपल्या हद्दीत येत नसल्याचे म्हणत सेवाग्राम पोलिसांकडे बोट दाखविले. सेवाग्राम पोलिसांनी हा परिसर आपल्या हद्दीत येत नसल्याचे सांगितले. यामुळे तपास रेंगाळल्याची ओरड परिसरात आहे.
शनिवारी सावंगी पोलिसांनी घटनास्थळ गाठत गावातील नागरिकांना म्हशीचा मृतदेह काढण्यास सांगितल्याची माहिती ठाणेदार शेगावकर यांनी दिली. शिवाय पाण्यात शोध मोहीम राबविली तरी काहीच आढळून आले नाही. आता या तलावातील पाणी उपसण्याची भागातील नागरिकांची मागणी आहे. त्यामुळे पाणी काढण्यात येत आहे. वृत्त लिहिस्तोवर येथे काहीच आढळून आले नव्हते.(प्रतिनिधी)
सेवाग्राम-सावंगी ठाण्याच्या हद्दीचा वाद
घटनास्थळ बोरगाव (मेघे) परिसरात येते. हा परिसर पहिले सेवाग्राम ठाण्यात होता. आता नव्याने सावंगी पोलीस ठाणे निर्माण करण्यात आले आहे. हा भाग त्यांच्या हद्दीत गेल्याची माहिती नागरिकांना देण्यात आली. घटनेची माहिती दिल्यानंतर सावंगी पोलिसांनी घटनास्थळ आपल्या हद्दीत येत नसल्याचे म्हणत सेवाग्राम पोलिसांकडे बोट दाखविले. सेवाग्राम पोलिसांनी पुन्हा सावंगी पोलिसांकडे बोट दाखविले. यात दोन दिवसांचा कालावधी गेला. ठाण्याच्या हद्दीच्या वादात मात्र घटनेकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष झाले.