बोर नदीपात्राला पडली कोरड
By Admin | Updated: May 24, 2016 02:17 IST2016-05-24T02:17:43+5:302016-05-24T02:17:43+5:30
पावसाळा व हिवाळ्यात वाहणाऱ्या बोर नदीचे पात्र उन्हाळ्यात मात्र कोरडे पडू लागले आहे.

बोर नदीपात्राला पडली कोरड
ओलिताचा प्रश्न गंभीर : शेतकऱ्यांवरील संकटांमध्ये भर
सेवाग्राम : पावसाळा व हिवाळ्यात वाहणाऱ्या बोर नदीचे पात्र उन्हाळ्यात मात्र कोरडे पडू लागले आहे. बंधाऱ्यातील पाणी कमी होऊन शेतकऱ्यांच्या ओलिताचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कोपरा व चानकी या गावातून बोर नदी गेली आहे. या नदीवरून दोन्ही गावातील शेतकऱ्यांनी शेतात जलवाहिनीच्या माध्यमातून सधनता प्राप्त केली. बाराही महिने शेतीला पाणी मिळायला लागल्याने शेतकरी ऊस व भाजीपाला पिकांकडे वळले; पण नदीपात्र बेशरम व अन्य जलवनस्पतीने वेढले गेले. नदीपात्र उथळ व्हायला लागल्याने पाणीसाठा कमी झाला. शेतकऱ्यांना पाणी मिळावे तसेच जलसाठा राहावा म्हणून बंधाऱ्यांची निर्मिती झाली. गत काही वर्षांपासून पाऊस कमी झाला. यामुळे पाणी वाहण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला. नदीतील वाळू कमी झाली. यामुळे उन्हाळ्यात नदीला डबक्याचे स्वरुप आले आहे. शेतातील पिकांना पाण्याची गरज आहे. चानकी येथे सहा शेतकरी नदीच्या पाण्यावर अवलंबून असून त्यांच्यासमोर पिकांना जगविण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
शासनाने नदी पात्राची स्वच्छता व खोलीकरण मोहीम राबविल्याशिवाय पर्याय नसल्याचे मत शेतकरी व्यक्त करतात. शेतीचा खर्च मोठा असून पिकांवर भविष्य अवलंबून असते; पण नदीच कोरडी पडल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.(वार्ताहर)